भाषा व लिपी

भाषा व लिपी

भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते.
भाषा मुख्यत: दोन प्रकारची आहे.
१. स्वाभाविक किंवा नैसर्गिक
२. कृत्रिम किंवा सांकेतिक
मनुष्यप्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा यांची तुलना नैसर्गिक भाषेत होते. 'भाषा' हा शब्द ‘भाष' या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे.
लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झाले आहे. भाषा हे एक संवादाचे प्रभावी माध्यम आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. मराठी आपली मातृभाषा आहे.
संस्कृत भाषा ही मराठीची जननी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोल येथील श्रीगोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. 'श्री चामुण्डराये करवियले' ही शिलालेखातील ओळ म्हणजे मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य होय. इसवी सन ९८३ च्या सुमारास हे वाक्य तिथे कोरले गेले असावे.
विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज, श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे अलोकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली. ‘लीळाचरित्र’ हा आद्यगद्यग्रंथ लिहिणारे म्हाइभट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत.
महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. २७ फेब्रुवारी हा जेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
आपण जी लिपी वापरतो, तिचे नाव देवनागरी लिपी आहे. बाळबोध लिपी असेही तिला म्हणतात. आपली हि देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली
आहे. लिहिणार्‍याच्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते. शब्द लिहून झाल्यावर त्यावर शिरोरेघा देण्याची पद्धत आहे.
ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो व कोणत्याची वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत. मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे असे माधव जुलियन यांनी म्हटले आहे.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी असे सुरेश भट म्हणतात.
देवनागरी लिपीत मराठी, हिंदी, संस्कृत भाषांचे लेखन आपण करू शकतो.



Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार