नाम
नाम
प्रत्यक्षात असणा-या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात.
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विदवत्ता इत्यादी.
खालील सर्व शब्दांना व्याकरणात नाम असे म्हणातात
मुलांची नावे | राजेश, दिनेश, रमेश, सागर |
मुलींची नावे | संगीता, शीतल, कुसुम |
पक्ष्यांची नावे | मोर, चिमणी, पोपट |
प्राण्यांची नावे | हत्ती, वाघ, सिंह |
फुलांची नावे | झेंडू, मोगरा, गुलाब, कमळ |
फळांची नावे | पपई, पेरू, आंबा, फणस |
भाज्यांची नावे | भोपळा, भेंडी, कोबी |
वस्तूंची नावे | फळा, खुर्ची, टेबल |
पदार्थांची नावे | चकली, चिवडा, लाडू |
नद्यांची नावे | गोदावरी, यमुना, गंगा |
पर्वतांची नावे | सातपुडा, सह्याद्री, हिमालय |
अवयवांची नावे | नाक, कान, डोळा |
नात्यांची नावे | आई, बहीण, भाऊ, बाबा |
काल्पनिक नावे | परी, राक्षस, देवदूत |
गुणांची नावे | महानता, नम्रता, शौर्य |
मनःस्थितीची नावे | उदास, दुःख, आनंद |
माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात
नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
१. सामान्यनाम
२. विशेषनाम
३. भाववाचक नाम
सामान्यनाम –
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.
सामान्यनाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे
उदाहरणार्थ :-
१) दर्शना हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो. तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो.
अशा प्रकारे 'मुलगी, नदी, शहर' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.
सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.
अ) पदार्थ वाचक नाम :-
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.
उदाहरणार्थ:-
तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.
ब) समुह वाचक नाम :-
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.
उदाहरणार्थ:-
मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.
(कळप, वर्ग, सैन्य, घड, समिती ही समूहाला दिलेली नामे आहेत यांना कोणी समुदायवाचक नामे असे म्हणतात. तसेच सोने, तांबे, दुध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमानानी मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना कोणी पदार्थवाचक नामे असे म्हणतात पण मराठीत या सर्वांची गणना सामान्यनामातच होते.)
विशेषनाम –
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात.
ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. अनेकवचन आल्यास सामान्यनाम समजावे.
उदाहरणार्थ:-
रामा, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत इत्यादी.
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्यनाम हे जातिवाचक असते.
उदाहरणार्थ:-
वैभव-(व्यक्तिवाचक), मुलगा (जातीवाचक)
भाववाचक नाम –
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-
धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी.
पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणा-या नामांना भाववाचक नामे असेच म्हणतात.
उदाहरणार्थ:-
धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.
सामान्यनाम किंवा विशेषनाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो, भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो.
सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते, पण विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनीच असतात.
सामान्यनामे आणि विशेषनामे यांना धर्मिवाचक नामे म्हणतात. धर्मी म्हणजे ज्यात धर्म किंवा गुण वास करतात ते.
भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
अ) स्थितिदर्शक :-
उदा. गरिबी, स्वतंत्र
ब) गुणदर्शक :-
उदा. सौंदर्य, प्रामाणिकपणा
क) कृतीदर्शक :-
उदा. चोरी, चळवळ
भाववाचक नामे साधण्याचे प्रकार
सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात.
शब्द | प्रत्यय | भाववाचक नाम |
नवल | आई | नवलाई |
पाटील | की | पाटीलकी |
गुलाम | गिरी | गुलामगिरी |
शांत | ता | शांतता |
मनुष्य | त्व | मनुष्यत्व |
सुंदर | य | सौंदर्य |
गोड | वा | गोडवा |
नामाचे कार्य करणारे इतर शब्द
नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी.
सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.
अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे
नियम १. : केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.
मुळच्या सामान्यनामांचा वापर विशेषनाम म्हणून पुढील वाक्यांप्रमाणे करता येतो.
१. मी आताच नगरहून आलो.
२. शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.
वरील वाक्यात नगर, तारा ही मुळची सामान्यनामे आहेत. पण ती वाक्यात विशेषनामे म्हणून वापरली आहेत.
नियम २. : केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.
मुळच्या विशेषनामांचा वापर सामान्यनाम म्हणून पुढील वाक्यांप्रमाणे करता येतो.
१. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
२. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत.
३. आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.
वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम ही मुळची विशेषनामे आहेत. पण येथे
कुंभकर्ण = अतिशय झोपाळू,
जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य,
सुदाम = अशक्त मुलगे व
भीम = सशक्त मुलगे
या अर्थाने वापरली आहेत.
म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.
नियम ३. : केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.
मुळच्या भाववाचक नामांचा वापर विशेषनाम म्हणून पुढील वाक्यांप्रमाणे करता येतो.
१. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.
२. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
३. माधुरी उद्या मुंबईला जाईल.
वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.
नियम ४. : विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.
मुळची विशेषनामे अनेकवचनी पुढील वाक्यांप्रमाणे वापरता येतात.
१. आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
२. या गावात बरेच नारद आहेत.
३. माझ्या आईने सोळा सोमवार केले.
विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.
नियम: ५. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.
मुळची विशेषणे नामांसारखी पुढील वाक्यांप्रमाणे वापरता येतात.
१. शहाण्याला शब्दाचा मार.
२. श्रीमंतांना गर्व असतो.
३. जातीच्या सुंदराना काहीही शोभते.
४. जगात गरिबांना मान मिळत नाही.
वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.
नियम: ६. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.
मुळची अव्यये नामासारखी पुढील वाक्यांप्रमाणे वापरता येतात.
१. आमच्या क्रिकेटपटूनची वाहवा झाली.
२. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो
३. हरी नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.
वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.
नियम: ७. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.
मुळची धातुसाधिते नामांसारखी पुढील वाक्यांप्रमाणे वापरता येतात.
१. ज्याला कर नाही त्याला डर कसली.
२. गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
३. ते ध्यान पाहून मला हसू आले.
४. देणान्याने देत जावे.
वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
Comments
Post a Comment