क्रियापद

क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.
देणे, करणे ही क्रियापदे नसून क्रियावाचक नामे आहेत.
'अस' या धातूने क्रिया दर्शवली जाते तर हो या धातूने स्थित्यंतर दाखविले जाते, अशा शब्दानाही व्याकरणात क्रियापदे असे म्हणतात.

धातुसाधिते ( कृदन्ते ):

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. धातूपासून तयार झालेल्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.
धातूंना जोडल्या जाणा-या प्रत्ययाना संस्कृतात कृदंत प्रत्यय असे म्हणतात. कृदंत म्हणजे ज्याच्या अंती केवळ क्रियादर्शक प्रत्यय आहे असा शब्द.
उदाहरणार्थ
१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
२) तो खेळताना हसला.
वरील वाक़्यामध्ये 'वाचताना', 'खेळताना' ही धातूपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.

कर्ता व कर्म

क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो, त्यास कर्ता असे म्हणतात.
वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुस-या कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परीणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्याचे कर्म.
वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात?
कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला 'णरा' हा प्रत्यय लावून कोण ? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.  
उदाहरणार्थ
१. राम आंबा खातो.
या वाक्यातील मूळ धातू खा आहे. त्याला णारा हा प्रत्यय लावल्यास खाणारा असा शब्द तयार होतो, तर राम आंबा खातो या वाक्याला खाणारा कोण ? असा प्रश्न केल्यास राम हे उत्तर मिळते म्हणून या वाक्याचा कर्ता राम आहे. तर खाण्याची क्रिया हि आंब्यावर झालेली आहे म्हणून आंबा हे या वाक्याचे कर्म होय.
२. मी बैलाला मारतो.
या वाक्यातील मूळ धातू मार, त्याला णारा प्रत्यय लावल्यास मारणारा हा शब्द तयार होतो तर मारणारा कोण? असा प्रश्न वाक्याला केल्यास उत्तर मी येते म्हणून या वाक्याचा कर्ता मी तर मारण्याची क्रिया बैलावर घडत असल्यामुळे या वाक्याचे कर्म बैल.
३. विद्यार्थी प्रामाणिक आहे.
या वाक्यातील मूळ धातू 'अस'. वाक्याला असणारा कोण? असा प्रश्न केल्यास उत्तर विद्यार्थी येते म्हणून या वाक्याचा कर्ता विद्यार्थी तर असण्याची क्रिया विद्यार्थ्यावरच घडते म्हणजेच क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही म्हणून या वाक्यात कर्म नाही. आहे हे क्रियापद अकर्मक आहे.
४. मला दुध आवडते.
या वाक्यातील मूळ धातू आवड, आवडणारा कोण ? असा प्रश्न या वाक्यात करण्याऐवजी आवडणारे काय? असा प्रश्न या वाक्यासाठी करावा लागतो कारण दुध हा पदार्थ आहे. आवडणारे काय ? असा प्रश्न केल्यास उत्तर दुध मिळते म्हणून या वाक्यात दुध हा कर्ता आहे.
५. त्याला थंडी वाजते. वाजणारी कोण? - थंडी. थंडी हा कर्ता.
६. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण ? - मुकुट. मुकुट हा कर्ता.
७. मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण ? - चंद्र. चंद्र हा कर्ता.
क्रिया करणारा तो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म.

क्रियापदाचे प्रकार

१. सकर्मक क्रियापद
२. अकर्मक क्रियापद 

सकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. 
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
    कर्ता      कर्म  क्रियापद
१. सूरज    आंबा खातो. 
२. जानवी  पूरी  खाते.
उदाहरणार्थ
१. आरोही लाडू खाते.
२. अनुराग निबंध लिहितो.
३. सागर चित्र काढतो. 

अकर्मक क्रियापदे

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्यांच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते.
   कर्ता   क्रियापद
१. सूरजलिहितो.
२. जानवीगाते.
उदाहरणार्थ
१. मी रस्त्यात पडलो.
२. आज भाऊबीज आहे.
३. सुनील उद्या पुण्याला जाईल.

व्दिकर्मक क्रियापदे

कधी कधी वाक्यामध्ये कर्त्यापासून निघालेल्या दोन क्रिया दोन कर्मावर परिणाम करतात किंवा वाक्यातील क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. तेव्हा त्याला व्दिकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. गुरुजी विध्यार्थ्याला व्याकरण शिकवितात.
२. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
३. तिने भिका-याला पैसा दिला.
वरील वाक्यांमध्ये शिकवितात, सांगितली, दिला ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना दोन कर्मे आहेत. पहिल्या वाक्यात गुरुजी हा कर्ता तर शिकविण्याची क्रिया व्याकरण व विद्यार्थी या दोघांवर घडले. तीच गोष्ट सांगितली व दिला या क्रियापदांच्या बाबतीतही आहे.
या क्रियापदांना दोन कर्मे लागतात. अशा क्रियापदाना व्दिकर्मक क्रियापदे असे म्हणतात. यातील वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात आणि व्यक्तिवाचक कर्माना अप्रतक्ष कर्म असे म्हणतात.
वरील वाक्यातील व्याकरण, गोष्ट, पैसा ही प्रत्यक्ष कर्म व विद्यार्थ्यांना, नातीला व भिका-याला ही अप्रत्येक्ष कर्म होत. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती व्दितिया असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते.

उभयविध क्रियापदे

एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते अशा क्रियापदाना उभयविध क्रियापदे असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या प्रकारचे होत.  
उदाहरणार्थ
१) माझे पुस्तक हरविले.
२) सूरजने माझे पुस्तक हरविले.
वरील दोन्ही वाक्यात हरविले हे क्रियापद आहे पण पहिल्या वाक्यात पुस्तक हा कर्ता असून दुसऱ्या वाक्यात सूरजने हा कर्ता आहे व पुस्तक हे कर्म आहे म्हणजेच हरविले हे क्रियापद दोन्ही वाक़्यामध्ये अकर्मक व सकर्मक किंवा कर्मासहित व कर्माशिवाय दोन्ही प्रकारे वापरले जाते.

अपूर्ण विधान क्रियापदे

अकर्मक क्रियापद असताना ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्या ठिकाणी विधानपूरकाची आवश्यकता असते. अशा क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
काही अकर्मक धातू असे आहेत कि कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो.
जसे-
जानवी यंदा शिक्षिका झाली.
वरील वाक्यामध्ये जानवी ही कर्ता आहे. परंतु या वाक्यामध्ये कर्म नाही वरील वाक्यामधून शिक्षिका हा शब्द काढला तर जानवी यंदा झाली. या शब्दा पासून काही अर्थबोध होत नाही.
थोडक्यात वाक्यातील झाली हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ आहे त्यामुळेच वरील वाक्यात शिक्षिका हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास पूरक ठरतो. अर्थात आवश्यक ठरतो. अशा विधानपुरक आवश्यकता असणाऱ्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. राम झाला.
२. मुलगा आहे.
३. आंबा निघाला.
४. गुरुजी दिसतात.
वरील वाक्यामध्ये झाला, आहे, निघाला, दिसतात ही क्रियापदे अपु-या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदाना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची जरुरी असते.
जसे-
१. राम राजा झाला.
२. आंबा नासका निघालो.
३. मुलगा हुशार आहे.
४. गुरुजी रागावलेले दिसतात.
वरील वाक्यांमधील राजा, हुशार, नासका, रागावलेले हे शब्द अपुरी विधाने पूर्ण करतात अशा शब्दांना विधानपूरक किंवा पूरक असे म्हणतात.

काही अकर्मक धातु

स्थितीवाचक , गतीवाचक , वस्तुस्थितीदर्शक , स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात तर कृतीवाचक धातू सकर्मक असतात.

काही अकर्मक धात् पुढीलप्रमाणे

अस, नस, हो, नहो, उठ, बस, नीज, झोप, थरथर, कुडकुड, रड, पड, सड, मर, सर, उड, धाव, थांब, शक, थक, जाग, झीज, वाढ, झड, जळ, किंचाळ, तुट, सुट, पहुड, उजळ, प्रकाश, ओरड, घोर, सळसळ, धडपड, चुरचुर, भुकेज, कीड, राह, वाह, फुल, उमल, उपज, निपज, जन्म, पिक, लोळ, वाज, भीज, शीज, सुज, वीझ, रूज, बिघड इत्यादी.

क्रियापदाचे अन्य प्रकार

धातूपासून बनलेल्या धातूपासून साधलेल्या अशा रूपांना धातुसाधिते असे म्हणतात.

संयुक्त व सहायक क्रियापदे

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातूसाधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त किंवा सहाय्यक क्रियापद म्हणतात. किंवा धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाना संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
संयुक्त क्रियापद बनण्यासाठी एकच अट असते ती म्हणजे संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी.
उदाहरणार्थ
१. क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
२. बाळ, एवढा लाडू खाऊन जा.
पहिल्या वाक्यात खेळू लागली तर दुस-या वाक्यात खाऊन जा ही संयुक्त क्रियापदे आहेत कारण खेळू लागली या क्रियापदातून खेळण्याची एकच क्रिया दर्शवली जाते त्याचप्रमाणे खाऊन जा या क्रियापदातून खाण्याची एकच क्रिया दर्शवली जाते.
पहिल्या वाक्यात खेळू हे धातुसाधित असून लागली हे मुख्य क्रियापद आहे तर दुस-या वाक्यात खाऊन हे धातुसाधित असून जा हे मुख्य क्रियापद आहे.
संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो तर विधानाला केवळ पूर्तता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते. जेव्हा धातुसाधित व मुख्य क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियाचा बोध होतो तेंव्हा धातुसाधितला मदत करणाच्या क्रियापदाला सहायक क्रियापद असे म्हणतात.
वरील दोन वाक्यात लागली व जा ही दोन सहायक क्रियापदे आहेत.
संयुक्त क्रियापदे = धातुसाधित + सहायक क्रियापद
अस, नस, हो, ये जा, दे, लाग, टाक, शक, शक, पाहिजे, नको वगेरे ठराविक धातूवरून सहायक क्रियापदे बनतात. यातील अस, हो, नस, हे धातू काळाचे प्रकार दाखवितात. पाहिजे, नको, नये, नलगे हे अर्थाचे प्रकार दाखवितात.
सहायक क्रियापदे सर्व काळी, सर्व पुरुषी चालत नाहीत म्हणून त्यांना गौण क्रियापदे असेही म्हणतात.

सिद्ध व साधित क्रियापदे

विविध प्रकारच्या शब्दांपासून तयार होणा-या धातूंना साधित धातू असे म्हणतात व साधित धातूंपासून बनलेल्या क्रियापदाना साधित क्रियापदे असे म्हणतात.
जेव्हा नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये इत्यादीना प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात व त्यांचा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी केला जातो त्याला साधित क्रियापदे म्हणतात.
जा, ये, कर, ऊठ, बस, असे जे मुळचे धातू आहेत. त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात व या सिद्ध धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदाना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात.
शब्दाच्या मुळधातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो.
२. आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.
३. तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला.
४. आम्ही हि पुस्तके मुंबईहून आणवली.
५. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
हाताळतो, पाणावले, स्थिरावला, आणवली, पुढारली ही क्रियापदे हाताळ, पानाव, स्थिराव आणव, पुढार या धातूंपासून बनली आहेत या धातूंना साधित धातू असे म्हणतात.
तर या साधित धातूंना प्रत्यय लागून हाताळतो, पाणावले, स्थिरावला, आणवली, पुढारली ही क्रियापदे बनली आहेत त्यांना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात.

प्रयोजक क्रियापदे

साधित धातूवरून प्रायोजक व शक्य क्रियापदे बनतात.

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुस-या कोणाला तरी करावयास लावत आहे असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणेने करतो किंवा कर्त्याला दुसरा कोणीतरी ती क्रिया करण्यास प्रेरित करतो असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
प्रयोजक म्हणजे प्रेरणा देणारा, कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया करण्यासाठी दुस-याला प्रवृत्त करतो.
उदा.
सूरज मित्राला शिकवितो.
वरील वाक्यात शिकवितो या क्रियापदामधून मित्राला शिकण्याची क्रिया करण्यासाठी सूरज प्रयत्न करतो असा अर्थ वरील वाक्यामध्ये अभिप्रेत आहे.
थोडक्यात सूरज कडून जी क्रिया घडविण्यात येते त्यालाच प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. आई त्या मुलाला हसविते.
२. झाड पाडले.
३. आई मुलाला खेळवते.
४. आई मुलाला चालवते.
५. बाईनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या.
प्रायोजक क्रियापद दोन प्रकारांनी तयार होतात.
१. मूळ धातूला 'व' हा प्रत्यय लागून
उदाहणार्थ  
हसतो - हसवतो - हसवितो
बसतो - बसवतो - बसवितो
चालतो - चालवतो - चालवितो
निजतो - निजवतो - निजवितो.
वरील शब्दात 'व' च्या पुढे 'इ' हा आगम म्हणजे नवीन वर्ण येतो याला इडागम असे म्हणतात.
खातो - खाववितो, देतो - देववितो, घेतो - घेववितो
२. मूळ धातूतील आद्याक्षरात वृद्धी किंवा गुण होतो.
उदाहरणार्थ  
गळणे-गाळणे,
चरणे-चारणे,
मरणे - मारणे,
फिटने-फेडणे,
तुटणे-तोडणे,
फुटणे-फोडणे

शक्य क्रियापदे

जे साधित धातू कर्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात.
वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याची क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.
उदा.
१. मला आता अभ्यास करवते.
२. माझ्याकडून आता चालवते.
वरील वाक्यामध्ये करवते, चालवते या क्रियापदामुळे कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दिसून येते. म्हणून त्यांना शक्य क्रियापदे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. मला आता काम करवते.
२. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.
३. मला दररोज वीस किलोमीटर चालवते.
४. आजारानंतर आता मला खेळवते.
५. बाईना वह्या वर्गात आणवतात.

अनियमित क्रियापदे

जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा मुळधातू उपलब्ध नसतो तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला अनियमित किंवा गौण असे म्हणतात.
मराठी भाषेत असे काही धातू आहेत कि ज्यांना काळाची किंवा अर्थाचे प्रत्यय न लावता ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात त्यांना गौण क्रियापदे किंवा अनियमित क्रियापदे असे म्हणतात.
आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, मये या क्रियापदांची रूपे अशा प्रकारची आहेत. त्यांची मूळ रूपे क्रियापदेच असून त्यात क एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही.
उदा.
१) देव सगळीकडे आहे.
२) मुलांनी खोटे बोलू नये.
३) मला जेवण पाहिजे.
वरील वाक्यामध्ये आहे, नये, पाहिजे ही क्रियापदे आहेत परंतू वाक्यात मुळधातू उपलब्ध नाही म्हणून अशा क्रियापदांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. मुलांनी सतत खेळू नये.
२. सुज्ञास अधिक सांगणे नलो.
३. या दरवाजाने जाऊ नको.
४. परमेश्वर सर्वत्र आहे.
५. मला कॉफी पाहिजे.
६. असे वागणे बरे नव्हे.
७. आई घरी नाही.

भावकर्तक क्रियापदे

ज्या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदाना भावकर्तृक क्रियापदे असे म्हणतात. या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो म्हणून काही व्याकरणकार त्यांना अकर्तृक क्रियापदे असे म्हणतात.
क्रियापद म्हटले की त्या शब्दामध्ये कोणतीतरी क्रिया अंतर्भूत असते आणि ही क्रिया करण्यासाठी कर्ता आवश्यक असतो. अशा काही वाक्यामध्ये क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हा क्रियापदाचा कर्ता मानला जातो अशा क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात.     
उदा.
१) आज सहा वाजताच उजाडले.
२) ऊन लागल्यामुळे त्याला मळमळले.
वरील वाक्यामध्ये उजाडले, मळमळले ही क्रियापदे आहेत या क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कोणी घडून आणली याचा आपणास बोध होत नाही.
थोडक्यात वाक्यामध्ये स्वतंत्रपणे कर्ता दिसत नाही अशा वाक्यात क्रियापदाचा भाव कर्ता मानला जातो, अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापदे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
२. पित्त झाल्यामुळे त्याला आता मळमळते.
३. उजाडले तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.
४. आज दिवसभर सारखे गडगडते.

करणरूप आणि अकरणरूप

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते तेंव्हा क्रियापदाच्या रुपाला करणरूप असे म्हणतात व हे विधान जेंव्हा नकारार्थी असते तेंव्हा क्रियापदाच्या त्या रुपाला अकरारूप असे म्हणतात.
उदाहरणार्थ
१. मुलांनी खरे बोलावे. ( करणरूप )
२. मुलांनी खोटे बोलू नये. ( अकरणरूप )
वरील वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये होकारार्थी तर दुसऱ्या वाक्यामध्ये नकारार्थी क्रियापद दिसते त्याला करणरूप व अकरणरूप क्रियापद असे म्हणतात.

स्वार्थी क्रियापद

स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मुळचा अर्थ होय. क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ होय.
ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व आज्ञा, विधी, किंवा संकेत वगेरे अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेंव्हा त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात.
क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी होत
जसे
१. मुले अभ्यास करतात.
२. तो घरी गेला.
३. मी खात्रीने पास होईल.

विध्यर्थी क्रियापद

जेंव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विध्यर्थी क्रियापद असे म्हणतात.
उदा.
१. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. ( कर्तव्य )
२. अंगी धैर्य असणार्यांनीच हे कार्य करावे. ( योग्यता )
३. .परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. ( शक्यता )
४. आता पाउस थांबवा. ( इच्छा )
५. कृपया उत्तर पाठवावे. ( विनंती )
६. तो बहुधा घरी असावा. ( शक्यता )

आज्ञार्थी क्रियापद

क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो तेंव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात.
उदा.
१. मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. ( आज्ञा )
२. देवी, सर्वांना सुखी ठेव. ( प्रार्थना )
३. एवढे आमचे काम कराच. ( विनंती )
४. मी हे काम करू ? ( अनुमोदन प्रश्न )
५. तेवढी खिडकी लाव पाहू. ( सौम्य आज्ञा )

संकेतार्थी क्रियापद

संकेत म्हणजे अट. जेंव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते, तेंव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात.
उदा.
१. मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता.
२. निमंत्रण आले, तर मी येईन.
३. पाऊस आला , तरी सहल जाणाराच.
४. तू आला नसतास, तरी चालले असते.



Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

जोड शब्द व त्याचे अर्थ