संज्ञा

संज्ञा

वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांची देवाण - घेवाण होते. इतर भाषांतील अनेक शब्द आपल्या भाषेत रूढ होतात. 
वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांच्या कामकाजांच्या संदर्भात किंवा रोजच्या बोलण्या - लिहिण्यातही त्यांचा सर्रास वापर केला जातो. इंग्रजी भाषेतील असे अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत. अशा शब्दांना पारिभाषिक संज्ञा म्हणतात. 

संज्ञा आणि त्याचे अर्थ पुढीलप्रमाणे :- 

प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) :-

याचा अर्थ लाकडाचा किंवा दगडाचा चौथरा होतो. चर्चमध्ये मेरी आणि येशूच्या मूर्तीपुढे जी रिकामी जागा असते तिला प्लॅटफॉर्म म्हणतात. ज्या ठिकाणी उभे राहून वक्ता भाषण करतो, चर्चा, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचन अशा गोष्टी जेथे सादर केल्या जातात. त्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. विचार मांडणे, चर्चा करणे या गोष्टी ज्या उपक्रमाद्वारे केल्या जातात त्या उपक्रमालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. स्टेशनला रेल्वे जेथे उभी राहते त्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. प्लॅटफॉर्म हा शब्द अशा प्रकारे वेगवगळ्या संदर्भात वापरला जातो.

फिचर :- 

फिचर याचा अर्थ आकार किंवा एखाद्या व्यक्तीच्या नाकाडोळ्यांची ठेवण. साधारणत: चांगल्या ठेवणीच्या संदर्भातच हा शब्द वापरला जातो. मासिकातल्या किंवा वृत्तपत्रातल्या एखाद्या लेखालाही फिचर म्हणतात. तीन तासांच्या पूर्णवेळ चित्रपटाला फिचर फिल्म म्हणतात.

फ्लॅश (झोत) :- 

पाणी किंवा प्रकाश यांच्या संदर्भात हा शब्द वापरतात. एखादी गोष्ट मनात चमकून जाणे यालाही फ्लॅश होणे म्हणतात. फ्लॅश टाकणे ही क्रिया जास्तकरून रंगभूमीच्या संदर्भात वापरली जाते. एखाद्या घटनेवर किंवा व्यक्तीवर फ्लॅश टाकला की बाकी सर्व गोष्टी अंधारात जाऊन तेवढयाच एका गोष्टीवर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होते. भूतकाळातील घटना दाखवण्यासाठीही या तंत्राचा वापर केला जातो.

पोस्टर (फलक) :-

एखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी मोठमोठी चित्रे किंवा काही मजकूर पोस्टरवर रंगवला जातो. ही चित्रे पत्र्यावर किंवा कापडावर काढली जातात. ती रस्त्यावर उंच ठिकाणी लावतात. हेतू हा कि या फलकांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घ्यावे. एखाद्या सिनेमाची किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा पोस्टर्सचा उपयोग करतात.

क्लोज - अप (समीप दृश्य) :-

'क्लोज-अप' याचा अर्थ जवळून चित्रित केलेले दृश्य. एखाद्या गोष्टीचे चित्रीकरण खूप बारकाव्याने करायचे असले  म्हणजे कॅमेरा व ते दृश्य किंवा व्यक्ती यांच्या मधले अंतर कमी करावे लागते, यालाच क्लोज-अप म्हणतात. चित्रीकरण किंवा फोटोग्राफी यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो.

डायरेक्टर (दिग्दर्शक) :-

नाटक सिनेमांतील पात्रांची निवड करणे, प्रत्येक दृश्याची पार्श्वभूमी ठरवणे, नट-नटयांना अभिनयाच्या बाबतीत सूचना देणे हे दिग्दर्शक करत असतो. एक प्रकारे नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात डायरेक्टर हा सर्वेसर्वा असतो. अर्थातच नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. काही बँकांच्या किंवा कंपन्यांच्या संचालकालाही डायरेक्टर म्हणतात.

अॅक्शन (अभिनय) :-

मनात जाग्या झालेल्या भावनेला अनुसरून हावभाव करणे, मुद्रेने, अंगविक्षेपाने मनातले भाव व्यक्त करणे यालाच अॅक्शन म्हणतात. आपण नेहमीच मनात उद्भवणाऱ्या भावांनुसार हावभाव करतो पण अॅक्शन किंवा अभिनय मात्र जाणीवपूर्वक केला जातो. अर्थातच त्याचा संदर्भ नाटक, सिनेमा, नृत्य या गोष्टींशी असतो. काही वेळा अॅक्शन हा शब्द कृती या अर्थानेही वापरला जातो. उदा. सरकारने याबाबत तातडीने अॅक्शन घ्यावी.

कॉमेंटरी (निवेदन) :-

कॉमेंटरी हा शब्द कॉमेंट या शब्दावरून आला. कॉमेंट म्हणजे टीका किंवा भाष्य. अर्थातच एखाद्या गोष्टीच्या चांगल्या वाईट बाजूंबद्दल बोलणे. एखादी गोष्ट घडत असते त्याच वेळी एखादी जाणकार व्यक्ती त्या संबंधीचे भाष्य किंवा निवेदन करत असते. आकाशवाणी, दूरदर्शन, क्रिकेटचा किंवा कुठल्याही खेळाचा सामना, एखादा कार्यक्रम किंवा मिरवणूक या संदर्भात हा शब्द वापरला जातो.

न्यूज व्हॅल्यू (वार्तामूल्य) :- 

न्यूज (वार्ता) याचा अर्थ काहीतरी नव्याने सांगणे. 'न्यूज' म्हणजे महत्त्वाची वार्ता असे म्हणण्यास हरकत नाही. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा साद्यंत तपशील देतच असतात. परंतु विशिष्ट संदर्भात एखादी महत्त्वपूर्ण बातमी देणे; हा वेगळा आणि महत्त्वपूर्ण संदर्भ त्या बातमीचे मूल्य ठरवतो. त्याला न्यूज व्हॅल्यू म्हणतात.
उदा.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
एखादी बातमी किती खळबळजनक आहे यावर तिचे वार्तामूल्य अवलंबून असते.

सबटायटल (उपशीर्षक) :-

मुख्य शीर्षकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी छोटया छोटया उपशीर्षकांचा उपयोग केला जातो, त्याला सबटायटल म्हणतात. जास्तकरून दूरदर्शनच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. परकीय भाषेतील चित्रपट दाखवताना तो इतर भाषिकांना कळावा म्हणून त्या त्या भाषेतून उपशीर्षके दिली जातात.

रिहर्सल (तालीम) :-

रिहर्सल म्हणजे एखाद्या गोष्टीची तालीम करणे. नाटकाचा पहिला जाहीर प्रयोग करण्याआधी केशभूषा - वेशभूषा करून प्रयोग सादर केला जातो, त्याला रिहर्सल म्हणतात. गाण्याच्या रीयाजालाही रिहर्सल म्हणतात.

ऑडियो (श्राव्य) :-

ऑडियो म्हणजे ऐकू येणारे. आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या कार्यक्रमांना ऑडियो कार्यक्रम म्हणतात.



Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार