वाक्यरूपांतर

वाक्यरुपांतर

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरुपांतर होय.

प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पररुपांतर

नेहमीच्या व्यवहारात आपण अनेक प्र्श्न विचारतो :
तू कोठे चाललास ? 
तुला किती गुण मिळाले?
प्रकृती आता कशी आहे ? वगैरे.  
प्रश्न विचारल्यानंतर आपणांला त्यांची काही उत्तरे हवी असतात म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात
उदा.
जगी सर्वसूखी असा कोण आहे ? (प्रश्नार्थी)
जगात सर्वसुखी असा कोण नाही? (विधानार्थी)
वरील वाक्यात होकारार्थी प्रश्न विचारला आहे; मात्र त्याने सूचित केलेले उत्तर नकारार्थी आहे. ‘जगी सर्वसूखी असा कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर ‘मी आहे’ असे द्यायचे नसते.  हा प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यात आला नसून त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. ‘जगात कोणीच सुखी नाही’ असे लेखकाला स्पष्ट म्हणायचे आहे.  
काही उदा.
१. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ? 
अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.
२. फुकट दिले तर कोण नको म्हणेल ? 
फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही,
३. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? 
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही.
४. कुणी कोडे माझे उकलील का ? 
माझे कोडे कुणी उकलणार नाही.
५. आपण त्याच्याकडे जायला नको का ? 
आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे.
६. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का ? 
मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी.

उदगारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पररुपांतर

काय उकडले हो काल रात्री (काल रात्री मनस्वी उकडले.)
काय अक्षर आहे त्याचे ! (त्याचे अक्षर अतिशय सुदंर आहे.)
वरील वाक्यांतील विधाने उद्गारार्थी आहेत. तीच कंसात विधानार्थी दिलेली आहेत. कंसातील विधानार्थी ठेवलेली आहेत. कंसातील विधानार्थी वाक्ये उद्गारार्थी ठेवल्यामुळे कशी परिणामकारक वाटतात. पाहा.  
‘अरेरे !फार वाईट गोष्ट झाली !’ अशासारख्या उद्गारार्थी वाक्यात केवळ भावना व्यक्त केलेल्या असतात पण वर दिलेल्या वाक्यांत भावनेपेक्षा वैपुल्य, अतिशयता, मोठी संख्या, परिमाण किंवा आधिक्य परिणामकारक रीतीने व्यक्त झालेले असते.
केव्हा – केव्हा मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरलेले असते.  
काही उदा.
१. केवढी उंच इमारत ही!  
ही इमारत खूप उंच आहे.
२. काय उकडले हो काल रात्री !  
काल रात्री खूपच उकडले.
३. आज गाडीत कोण गर्दी !  
आज गाडीत अतोनात गर्दी होती.
४. काय अक्षर आहे त्याचे !  
त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे.
५. मला लाख रुपये मिळाले तर !  
मला लाख रुपये मिळावेत अशी तीव्र इच्छा आहे.
६. मी राज्याच्या मुख्यमंत्री असतो तर !  
मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे.

होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पररुपांतर

हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी)
हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. (नकारार्थी)
दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे पण दुसरे वाक्य अधिक परिणामकारक वाटते. हे करताना आपण पहिल्या वाक्यातील ‘मोठी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ‘लहान’ हा वापरला व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून 'नव्हे' हा नकारार्थी बदल शब्द घातला.

विरुध्दार्थी शब्द बनविण्याचे प्रकार दोन आहेत.

शब्दाच्या मागे ‘अ, अन्, न, ना, बे, गैर, विना’ यांसारखे उपसर्ग जोडून -
उदा.
मंगल – अमंगल   
कळत –नकळत    
जबाबदार – बेजबाबदार   
तक्रार – बिनतक्रार
विरुध्द अर्थाचा दुसरा शब्द वापरुन – 
उदा.
श्रीमंत  - दरिद्री    
सुरुवात  - शेवट   
स्वीकारणे  - नाकारणे  
नफा – तोटा
काही उदा.
१. ही काही वाईट कल्पना नाही. नकारार्थी  
ही कल्पना ब-यापैकी आहे. होकारार्थी
२. हे आम्हाला सोयीचे नाही.  
हे आम्हाला गैरसोयीचे आहे.
३. तो कोठे न थांबता बोलला.  
तो अस्खलित बोलला.
४. त्याला इथे थांबवा.  
त्याला पुढे जाऊ देऊ नका.
५. त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.  
त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

प्रयोगांचे परस्पर रुपांतर

मराठीत मुख्य प्रयोग तीन आहेत.
१) कर्तरी
२) कर्मणी
३) भावे
या प्रयोगाचे परस्पर रुपांतर करता येईल.  
उदा.  
'संजय नोकरी करतो' 
या कर्तरीप्रयोगातील वाक्याचे रुपांतर कर्मणीप्रयोगात करावयाचे तर 'संजयने नोकरी केली' असे होईल.  
म्हणजे काळात बदल हा करावाच लागतो. त्यामुळे तोच मूळ अर्थ कायम राहात नाही. मात्र ज्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो तो करताना काळ बदलावा लागत नसला तरी मराठीला अपरिचित अशी वाक्यरचना करावी लागते.
उदा.  
तो पुस्तक वाचतो. (कर्तरी)
त्याचे पुस्तक वाचून झाले. (कर्मणी)
त्याने पुस्तक वाचावे. (भावे)
काही उदा.
मांजर उंदीर पकडते. कर्तरी  
उंदीर मांजराकडून पकडला जातो. कर्मकर्तरी
मी चहा घेतला. कर्मणी  
माझ्याकडून चहा घेतला गेला. कर्मकर्तरी
रामाने रावणास मारले. भावे  
रावण रामाकडून मारला गेला. कर्मकर्तरी  

मुख्य व गौण वाक्यांचे परस्पररुपांतर

वाक्याचा अर्थ न बदलता त्याचे परस्पर रुपांतर करता येणे शक्य आहे.
१. जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो होतो.
२. जेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो तेव्हा शाळेची घंटा अद्याप व्हायची होती.
( पहिल्या वाक्यातील गौणवाक्य दुस-या वाक्यात मुख्य वाक्य व्हायची होती.)
काही उदा.
घड्याळात नऊ वाजताच, तोच नळाचे पाणी गेले.
जेंव्हा नळाचे पाणी गेले, तेंव्हा घड्याळात बरोबर नऊ वाजले होते.
जे जे चकाकते ते ते सोने नव्हे.  
जे जे सोने नसते तेदेखील कधी कधी चकाकते.

केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पररुपांतर

वाक्यसंश्लेषण किंवा वाक्यसंकलन हा वाक्यरूपांतरणाचा एक भाग होय.
उदा.  
माझ्या पोटात दुखत आहे. मी शाळेत येणार नाही.
केवल वाक्य - मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.  
संयुक्त वाक्य - मला ताप आला आहे, म्हणून मी शाळेस जाणार नाही.
मिश्रवाक्य - मी शाळेस जाणार नाही, कारण मला ताप आला आहे.

शब्दांची जात बदलन वाक्यरचना करणे.

शब्दांच्या जाती आठ म्हणजे त्यांची कार्ये आठ. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो. म्हणजे त्या – त्यावेळी त्या शब्दाची जात बदलते पण अर्थामध्ये बदल होत असतो.  
शब्दाच्या बदल न करता शब्दाची जात बदलता येणे शक्य आहे.  
उदा.
श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
श्रीमंतांना गर्व असतो. (नाम)
त्याच्या डोळ्यांत पाणी आले. (नाम)
त्याचे डोळे पाणावले. (क्रियापद)
मी कागद टरकावून फेकून दिला. (क्रियाविशेषण)
मी कागद टरकावला व फेकून दिला. (क्रियापद)
हा मुलगा हुशार आहे. (विशेषण)
हा हुशार मुलगा आहे. (सर्वनाम)

अनेक शब्दांएवजी एक शब्द योजने.

१. पंधरा दिवसातून भरणारी अशी आमची बैठक असते.  
आमची पाक्षिक बैठक असते.  
२. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता.  
तो आदिवितीय योद्धा होता.
३. निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था त्यांनी काढली.  
त्यांनी एक अनाथालय काढले.
४. जिचा नवरा वारला आहे अशी ती स्त्री आहे.  
ती विधवा आहे.
५. त्या बाईला आता कोणतीही इच्छा राहिली नाही.  
ती बाई निरीच्छ आहे.
६. या पुस्तकाच्या छपाईत कोणत्याच प्रकारचे दोष राहिले नाहीत.  
या पुस्तकाची छपाई निर्दोष आहे.

वाक्यरुपांतर प्रकारची काही महत्वाची उदाहरणे.

१. ताजमहाल खूप सुंदर आहे. विधानार्थी  
किती सुंदर आहे ताजमहाल ! उद्गारार्थी
२. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. विधानार्थी  
तुझ्या भेटीने किती आनंद झाला. उद्गारार्थी
३. पांढरा रंग सर्वाना आवडतो. विधानार्थी  
पांढरा रंग सर्वाना कोणाला आवडत नाही ? प्रश्नार्थक
४. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. विधानार्थी  
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही ? 
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करावयाचे बाकी ठेवले नाही. नकारार्थी
५. तुझे असे खराब अक्षर पाहून डोळे मिटावेसे वाटतात. होकारार्थी  
तुझे असे खराब अक्षर अगदी बघवत नाही. नकारार्थी
६. सहलीत खूप मजा आली. होकारार्थी  
काय मजा आली सहलीत
७. किती सुंदर मूर्ती आहे ही ! उद्गारार्थी  
ही मूर्ती खूप सुंदर आहे. होकारार्थी
८. गणेशचे हे चित्र खराब आहे. होकारार्थी  
गणेशचे हे चित्र चांगले नाही. नकारार्थी
९. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे. होकारार्थी  
भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे ?नकारार्थी
१०. लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुख होते. होकारार्थी
लोकांचे दुख पाहून महात्म्याला सुख होत नाही. नकारार्थी



Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार