वाक्यांचे प्रकार

वाक्यांचे प्रकार        

१. विधानार्थी वाक्य            

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.        
उदाहरणार्थ      
माझे वडील आज परगावी गेले.    

२. प्रश्नार्थी वाक्य      

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.  
उदाहरणार्थं           
तू मुंबईला केंव्हा जाणार आहेस ?  

३. उद्गारार्थी वाक्य        

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.          
उदाहरणार्थ            
अबब ! केवढी प्रचंड आग ही !           

४. नकारार्थी वाक्य  

वाक्यातील विधाने हि कधी कधी होकारार्थी असतात जसे गोविंदा अभ्यास करतो पण काही विधानात नकार असतो जसे त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही. अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात. या होकारार्थी व नकारार्थी वाक्यानाच करणरुपी व अकरणरुपी वाक्ये असे म्हणतात.         

क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात.        

१. स्वार्थी वाक्य        

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. 
उदाहरणार्थ   
मुले घरी गेली - जातात - गेली - जातील.      

२. विध्यर्थी वाक्य         

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.       
उदाहरणार्थ     
१) मुलांनी वडिलांची आजा पाळावी.  
२) मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.        

३. आज्ञार्थी वाक्य         

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.        
उदाहरणार्थ  
१. मुलांनी चांगला अभ्यास करा.     
२. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे.      

४.संकेतार्थी वाक्य        

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.          
उदाहरणार्थ  
पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.     

एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्यांचे आणखी तीन प्रकार पडतात.

१. केवलवाक्य           

ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात.              
उदाहरणार्थ        
१) आम्ही जातो आमुच्या गावा.  
२) तानाजी लढता लढता मेला.  
३) अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.  
४) एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला.  
५) पांढरे स्वछ दात मुखास शोभा देतात.  
६) शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.  
७) एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली.           

२.मिश्रवाक्य           

एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक समिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.    
उदाहरणार्थ             
१) जे चकाकते, ते सोने नसते.  
२) गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.  
३) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.  
४) गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ  
५) दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती.    

३. संयुक्तवाक्य     

दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.           
उदाहरणार्थ        
१) मी रोज सकाळी पहाटे लवकर उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.  
२) सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांसोबत फिरावयास जातो.           
मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बाकीची सर्व गौण असतात. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधानवाक्ये असतात.              

गौणवाक्यांचे प्रकार         

नाम वाक्य :-       

दिलेल्या मिश्र वाक्यातील एका वाक्याला 'काय' ने प्रश्न विचारल्यास उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न विचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते व कर्म नेहमी नाम असते म्हणून अशा गौण वाक्यास नाम वाक्य म्हणतात.       
नामाचे कार्य करणा-या गौणवाक्याला नामवाक्य म्हणतात.            
उदाहणार्थ     
१) तो उत्तीर्ण झाला, फार चांगले झाले.  
२) गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे.  
३) प्रश्न असा आहे की त्याच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.  
४) आम्ही स्पर्धत हरलो ही वार्ता खरी आहे.
५) बाबा म्हणाले की, आज गेलेच पाहिजे.  
६) त्याचा विश्वास आहे, की मला बक्षीस भेटेल.         

विशेषण वाक्य :-            

मुख्य वाक्यातील एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या गौण वाक्याला विशेषण वाक्य म्हणतात.        
अशी वाक्य बहुधा जो-तो, जे-ते, जी-ती ने  जोडलेली असतात. यातील पहिले वाक्य बहुधा विशेषण गौण वाक्य असते.      
उदाहणार्थ           
१) जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.  
२) जी आपणाला काही शिकवितात अशी पुस्तके मुलांनी वाचावी.            

क्रियाविशेषणवाक्ये        

गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थळ, काळ, रीत, संकेत, कारण, उद्देश याविषयी माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण गौण वाक्य होय.            
१) जेंव्हा घाम गाळावा तेंव्हाच खायला भाकरी मिळते - कालदर्शक            
२) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती - स्थलदर्शक            
३) तुला जसे वाटेल तसे वाग -  रीतीदर्शक         
४) जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असशील तर उत्तीर्ण होशील - संकेतदर्शक     
५) पावसाळा असला तरी मुले अलीकडे छत्र्या बापरत नाहीत - विरोधदर्शक               
६) तो इतका मोठ्याने बोलला कि त्याचा आवाज बसला - कारणदर्शक           
७) शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो - उद्देशदर्शक           
उदा.             
१) जेथे जावे तेथे गर्दीच असते.
२) तो वाचला, कारण त्याने उडी मारली.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार