म्हणी

म्हणी      

म्हण म्हणजे विशिष्ट पद्धतीचे बोलणे. म्हणीच्या बाबतीत, एका पूर्ण विधानात बोलणाऱ्याच्या मनातील एक अनुभव व्यक्त झालेला असतो.  
म्हणी हा आजपर्यंत होऊन गेलल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश आहे. परंपरेने लोकांच्या बोलण्यात आलेले नीतिपर, अनुभवसिद्ध वाक्यांच्या म्हणी तयार झालेल्या आहेत. वाक्प्रचार व म्हणीनी तयार झालेली भाषा सर्वांना आवडते.
सामान्यतः म्हणींच्या मागे कथेची पार्श्वभूमी असते. म्हणी त्याचा निष्कर्ष असतो.
उदा.
काखेत कळसा गावाला वळसा.
अर्थ :- एका बाईचा विसरभोळेपणा दाखवला आहे. तिच्या कमरेवर कळशी असते; पण तिला त्याचा पत्ता नसतो. ती गावभर कळशी शोधत फिरत असते. जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेत राहणे हा अर्थ यातून व्यक्त होतो. 
म्हणी व त्यांचे अर्थ-

अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो.
अडला हरी (नारायण) गाढवाचे पाय धरी - बुधिमान माणसाला देखील एखाद्या अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
अगअग म्हशी मला कुठे नेशी - काहीतरी पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे.
अति रागा भीक मागा - कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्य भिकेला लागतो.
अंथरूण पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
असतील शिते तर जमतील भूते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्याभोवती जमतात.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - अयोग्य माणसाशी संगत केल्याने जिवाला धोका असतो.
अन्नछत्री जेवणेवर मिरपूड मागणे - दुस-याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखीन काही गोष्टींची मागणी करायची.
अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण - मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
अती खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.
अन्नाचा मारलेला स्साली पाहीतलवारीचा मारलेला वर पाही - सोम्यपणामुळे मनुष्य नरम होतो, उद्धटपणामुळे तो आपला शत्रू बनतो.
असेल तेव्हा दिवाळीनसेल तेव्हा शिमगा - अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे, विपत्तीचे दिवस आले की रडणे.
अर्धी टाकून सगळीला धावू नये - संबंध वस्तू मिळविण्याचा प्रयत्न करीत असता हाती असलेली अर्धी वस्तू टाकून देणे मूर्खपणाचे होय.
अर्थी दान महापुण्य - संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते.
अर्ध्या वचनात असणे - आज्ञा होईल केव्हा व ती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे.
अडली गाय फटके स्वाय - संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो.
अंगापेक्षा बोंगा जड कुठे चालला सोंगा? - ख-या गोष्टी पेक्षा दिखाऊपणाच जास्त.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोडीशी संपत्ती किंवा गुण प्राप्त झाल्याने गर्व होणे.
अस्मान ठेंगणे होणे - (स्वर्ग दोन बोटे उरणे) गर्व होणे, ताठ्याचा कळस होणे.

आधी पोटोबा मग विठोबा (आधी प्रपंच मग परमार्थ) - आगोदर पोटपूजा मग देवपूजा, आधी स्वार्थ मग परमार्थ.
आपलेच दातआपलेच ओठ - आपल्याच माणसानी केलेल्या चुकांमुळे निर्माण झालेली अडचणीची परिस्थिती.
आकारे रंगती चेष्टा - मनुष्याच्या बाह्य स्वरूपावरून तो कोणती कृती करील हे व्यक्त होते.
आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी (भांडवल) जाते - बुद्धी नष्ट झाली की धनाचा ही नाश होतो.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन - अपेक्षा धरावी त्याहून जास्त लाभ होणे.
आडात नाही तर पोह-यात कोठून येणार? -  न्याय बुद्धीच नाही, तर न्याय कसा मिळेल?
आपली पाठ आपणास दिसत नाही - स्वतःचे दोष दुस-यानी दाखविल्यावर कळतात (किंवा) आपल्या मागून केलेली स्तुती किंवा निंदा आपल्याला सांगितल्या शिवाय कळत नाही.
आपला हात जगन्नाथ - आपली इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असता, काही कमी पडत नाही.
आई जेवू घालीनाबाप भीक मागू देईना - दोन्ही कडून अडचण.
आजा मेलानातू झाला - घरातील एक माणूस कमी झाले तर दुसरीकडे एक वाढले एकूण सारखेच.
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते -अशक्य गोष्टी बद्दल चिकित्सा करणे योग्य नसते.
आपले नाक कापून दुस-याला अपशकुन - दुस-याचे वाईट व्हावे म्हणून अगोदर स्वतःचे नुकसान करून घेणे.
आयत्या बिळात नागोबा - एखाद्याने स्वतःसाठी चांगली गोष्ट संपादन करावी आणि दुस-याने त्याचा आयता फायदा घ्यावा.
आईजीच्या जिवावर बाईजी उदार - दुस-यांच्या पैशावर स्वतः चैन करणे.
आपापाचा माल गपापा - श्रम न करता मिळालेला पैसा निष्काळजीपणाने खर्च करणे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - आधीच एखाद्या गोष्टीची हौस आणि त्यात इतरांचे उत्तेजन.
आंधळे दळते कुत्रे पीठ स्वाते - काम करणार एकजण, पण फायदा उठवणार दुसराच.
आधणातले रडतात आणि सुपातले हसतात - दुस-याच्या दुःखाला हसणारे लोक त्याच दुःखाचे धनी होतात.
आपल्या कानी सात बाळ्या - एखाद्या कृत्यात आपले अंग नाही म्हणून अज्ञान दाखविणे.
आपण हसे लोकाशेंबूड आपल्या नाका - ज्या दोषाबद्दल आपण दुस-यांना हसतो, तोच दोष आपल्या अंगी असणे.
आले अंगावर घेतले शिंगावर - आयते मिळते त्याचा फायदा करून घेणे.
आपला तो बाळ्या (बाब्या) दुस-याचे ते कारटे - स्वतः संबंधी जी उदार बुद्धी असते ती दुस-यांच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती.
आंधळ्या बहिच्याशी गाठ - परस्परंना मदत करण्यास असमर्थ असणा-यांची गाठ.
आधीच तारे त्यात शिरले वारे - स्वतःच्या हौसेत दुस-यांच्या उत्तेजनाची भर पडणे.
आगीतून निघून फोपाट्यात पडणे - लहानशा संकटातून निघून मोठ्या संकटात सापडणे.
आठ पुरभय्ये नऊ चौके (व्यक्ति तितक्या प्रकृती) -एकमेकांशी जमवून घेऊ न शकणा-यांनी एकत्र येणे.
आभाळास ठिगळ कोठवर लावणार ? - फार मोठ्या संकटात सापडल्यावर बाहेर पडणे कसे शक्य होईल ?
आकाशपाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करणे.
आठ हात लाकूड व नऊ हात धलपी - अगदी अशक्य अशी गोष्ट सांगणे (कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे).
आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी - अडाणी माणसात थोडासा जाणता असला तरीही तो पंडित म्हणवून घेतो.
आप करे सो काम पदरी होय सो दाम - स्वतःच्या कामावर तसेच स्वतःजवळ असलेल्या पैशावरच फक्त विसंबता येते.
आपल्या पोळीवर तूप ओढणे - दुस-यांचा विचार न करता फक्त स्वतःचाच फायदा पहाणे.
आवळा देऊन कोहळा काढणे - अल्पशा मोबदल्यात दुस-यापासून मोठे कार्य करून घेणे.
आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे - दुसन्यापासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.

इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणीत सापडणे.
इकडचा डोंगर तिकडे करणे - काहीतरी प्रचंड उद्योग करणे.
इळा (विळा) मोडून खिळा करणे - अधिक किमतीची वस्तू थोड्याशा लाभाकरिता हातची घालवून देणे.

उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही - दुस-यांचे नुकसान होत असतानाही त्याचा प्रतिकार न करता स्वस्थ बसणे माणसाच्या हातून होत नाही.
उचलली जीभ लावली टाळ्याला - बोलणे सोपे असते, पण करणे कठीण, शक्याशक्यतेचा विचार न करता बोलणे.
उपट सूळ घे खांद्यावर - नसती कटकट मागे लावून घेणे.
उथळ पाण्याला खळखळाट फार - ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त अस्तो.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणामुळे मुर्खासारखे वागणे.
उंदराला मांजर साक्ष - हिताचे संबंध असलेले दोघेही एकमेकांचे साक्षीदार असण्याची परिस्थिती.
उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो ? - येईल त्या संकटाला तोंड देण्याची तयारी असल्यावर कशाला कोण घाबरणार?
उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती ! - हाती घेतलेले काम सोडून भलत्याच गोष्टींची उठाठेव करणे.
उंटावरून शेळ्या हाकणे - अतिशय आळस व निष्काळजीपणा करणे.
उठता लाथ बसता बुक्की - प्रत्येक कामात एक सारखी शिक्षा करीत राहणे.
उधारीचे पोते सव्वा हात रिते - उधार माल घेतल्याने नुकसान जास्त.
उडत्या पाखराची पिसे मोजणारा - फार हुषार मनुष्य.
उंबर फोडून कंबरे काढणे - लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या कामाचा विध्वंस करणे.

ऊन पाण्याने घरे जळत नसतात - एखाद्या सभ्य गृहस्थावर खोटे आरोप केल्याने त्याची बेआबू होत नाही.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - चांगल्या गोष्टीचा कधीही गैर फायदा घेऊ नये.

एकाने गाय मारली म्हणून दुस-याने वासरू मारू नये -एकाने एक मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुस-याने लहानशी का होईना ती वाईट गोष्ट करू नये. दोघे ही दोषीच.
एका हाताने टाळी वाजत नाही - घडणा-या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत - एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहात नाहीत.
ऐकावे जनाचेकरावे मनाचे - लोकांचे मत समजून घ्यावे. पण आपल्याला योग्य वाटेल ते करावे.
एक पंथ दो काज - एकाच वाटेवरची दोन कामे एका खेपेत करणेच योग्य.
एक घाव दोन तुकडे - पटकन निकाल लावणे.
एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एक ही काम धड होत नाही. सगळेच अपूर्ण राहते.
एका माळेचे मणी - सगळे सारखेच.
एका कानाने ऐकावे व दुस-या कानाने सोडून द्यावे -एखादी गोष्ट दुस-यांची ऐकावी पण ती मनावर घेऊनये किंवा तसे वर्तन ही करायला जाऊ नये.
एकदा कानफाट्या नाव पडले की पडले - लोकांमध्ये एखाद्याचे नाव वाईट झाले तर ते सुधारणे कठीण (अशक्य) असते.
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी -दूसरा संकटात सापडला असता त्याला मदत करायची सोडून थोडासा का होईना स्वत:चा फायदा होत असल्यास तो करून घेणे.
एका पायावर तयार (सिद्ध) असणे - तत्पर असणे, फार उत्कंठित होणे.

ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ज्याला मर्म माहीत असते, तो घात करू शकतो.
ओ म्हणता तो येईना - अक्षरशत्रू असणे.
कर नाही त्याला डर कशाला ? - ज्याने वाईट काम केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही.
कसायाला गाय धारजिणी (धार्जिण) - कठोर व दुष्ट धन्याशी नोकर गरिबीने वागतात, पण गरीब धन्याची मात्र हेळसांड करतात.

कडू कारले तुपात तळलेसाखरेत घोळलेतरी कडू ते कडूच - ज्याचा स्वभाव जन्मतः वाईट असल्यास तो सुधारणे कठीण.
करील ती पूर्वदिशा - एखादा माणूस जे काही सांगतो, ते इतरानी निमूटपणे ऐकून घेणे.
करावे तसे भरावे - केलेल्या दुष्कृत्यास त्याप्रमाणात शिक्षा भोगण्यास तयार असावे.
करील ते कारण आणि बांधील ते तोरण - एखादा माणूस जे सांगतो किंवा करतो तेच खरे मानणे.
कधी तुपाशीकधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते, त्यात चढउतार असतोच.
कशास नाही ठिकाणाबुधवारचे लग्न - (कसा - पैसे ठेवण्याची छोटी पिशवी) पैशाचा बंदोबस्त व्हायच्या अगोदर लग्न ठरविणे अयोग्य, निरर्थक गोष्टी करू नयेत.
कवडी कवडी माया जोडी - काटकसरीने पैसा जमविणे.
कंरगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय ? -प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतेच की नाही ?
कामापुरता मामा व ताकापुरती आजीबाई - काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.
काळ आला होतापण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात संकट टळले.
काखेत कळसागावाला वळसा - जवळ असलेल्या वस्तूचा भान नसल्याकारणाने दूरवर जाऊन शोध घेणे.
काप गेले आणि भोके रहिली - कीर्ती आणि वैभव गेले तरी त्याचा पोकळ अभिमान मात्र शिल्लक राहतो. (काप - कानातला दागिना)
कानामागून आली आणि तिखट झाली - मागून येऊन सुद्धा थोड्याच दिवसात वरचढ होणे.
कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर - ऐकलेली गोष्ट व पाहिलेली गोष्ट यात जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - वाईट माणसांच्या शापाने चांगल्या माणसांचे काही नुकसान होत नाही.
काडी चोर तो माडी चोर - लहान सहान अपराध करणा-या माणसाची मोठा अपराध करायचीही प्रवृत्ती होते.
काही सोन्याचा गुणकाही सवागीचा गुण - एखादे मोठे कार्य करीत असता जसे मोठ्या लोकांचे सहाय्य होते तसेच क्षुद्र लोकांचे ही सहाय्य होऊ शकते.
काट्याचा नायटा (होतो) - एखादी क्षुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करू नये ती विकोपाला जाऊन भयंकर परिणाम होऊ शकतात.
काडीची सत्ता आणि लास्वाची मत्ता बरोबर होत नाहीत -थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते खूपशा पैशाने देखील होऊ शकत नाही.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही - खरी मैत्री क्षुल्लक कारणाने तुटत नाही.
काळ्यापेक्षा पिठा दगड बरा - दोन्ही वस्तू पैकी एक वस्तू अधिक चांगली. (दगडापेक्षा वीट मऊ)
कुडी तशी पुडी - जसे शरीर तसा आहार.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच (कुत्र्याचे शेपूट वाकडे) - जातीस्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
कुडास कानठेवी ध्यान (भिंतीलाही कान असतात) -भिंतीच्या आडूनही कोणी ऐकण्याची शक्यता आहे म्हणून सावधगिरीने बोलावे.
कुचेष्टे वाचून प्रतिष्ठा नाही - जगात प्रतिष्ठा मिळवायची असेल तर वाईट ऐकण्याचीही तयारी हवी, त्रास सोसल्या शिवाय मोठपणा मिळत नाही.
कुन्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलीच माणसे आपल्या नाशास कारणीभूत होतात.
कुंपणानेच शेत स्वाल्ले - ज्याच्या हाती एखाद्या गोष्टीचे रक्षण करण्याचे काम दिले तर त्यानेच त्याचे रक्षण करण्याचे सोडून नुकसान करणे.
कुसंतानापेक्षा निसंतान बरे - कुपुत्र असण्यापेक्षा मुळीच संतान नसलेले अधिक बरे.
केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी - अत्यंत दरिद्री अवस्था.
कोरड्या बरोबर ओले ही जळते - वाईट माणसांच्या संगतीत चांगला माणूस असला तर वाईटाच्या नाशाबरोबर त्याचाही नाश होतो.
कोंड्याचा मांडा करून स्वावा - जे आपल्याला मिळते त्यात सुखासमाधानाने रहावे.
कोळसा उगाळावा तितका काळाच (कोळसा किती जरी उगाळला तरी तो काळा तो काळाच) - वाईट गोष्ट नेहमी वाईटच असायची, त्यात सुधारणा अशक्य.
कोरडी आग पुरवतेओली आग पुरवणार नाही - विस्तवाने लागलेली आग बुजविता येते, पण भुकेची आग बुजविता येत नाही.
कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भट्टाची तट्टानी - एक अतिशय थोर व श्रीमंत, दुसरा अतिशय गरीब व क्षुद्र यांची जोडी जमणे अशक्य.
कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तू मिळाली तरी तेवढ्यावरच खुष होतात.
कोठे राजा भोज आणि कोठे गंगा तेलीण - चांगल्या वस्तू बरोबर क्षुद्र वस्तूची बरोबरी करणे अयोग्य.
कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे रहात नाही - जी गोष्ट व्हावयाचीच आहे त्याच्यावर कोणत्याही अडथळ्याचा परिणाम होत नाही.
कोल्ह्यांना द्राक्षे आंबट - जी गोष्ट अशक्य आहे, त्याची निंदा करणे.
कोणाची होऊ नये बायकोआणि कोणाचे होऊ नये चाकर - दुस-यांच्या तंत्राने चालणा-यांना स्वतंत्रता नसतेच.
कोणाचा पायपोस कोणाचे पायात नसणे - मोठा गोंधळ निर्माण होणे.
कानाला वडा लावून घेणे - एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेणे.
कानावर हात ठेवणे - आपल्याला काहीच माहीत नाही असा भाव व्यक्त करणे.

र्चणान्याचे वर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते - दुष्ट माणसे स्वतःहून दानधर्म किंवा परोपकार करीत नाहीत पण उदार माणसानी काही चांगले करायला गेल्यास त्यांच्या कामात अडथळा आणतात.
खर्‍याला मरण नाही - खरी गोष्ट कधीही कोणीही लपवू शकत नाही. ती कधीतरी उघडकीस येणारच.
खाण तशी माती - बीजाप्रमाणे अंकुर असतो, तसेच आई वडिलाप्रमाणे त्यांची मुले असतात.
खाई त्याला खवखवे - जो कोणी अपराध करतो त्याला त्याची सारखी जाणीव होत असते व तो अस्वस्थ होतो.
खाजवून अवधान आणणे - आपल्याच हाताने आपल्या जिवाला त्रास करून घेणे.
खायला काळ भुईला भार - अत्यंत निरुपयोगी मनुष्य कोणालाही नको असतो.
खाऊ जाणे तो पचवू जाणे - जो कोणी वाईट कृत्य करण्यास तयार असतो तो त्याचा परिणामही भोगावयास सिद्ध असतो किंवा जो चांगले काम करण्यास हाती घेतो, तो शेवटही करतो.
खाईन तर तुपाशीनाहीतर उपाशी - एखाद्या गोष्टीबद्दल आग्रह धरणे.
खाजवून स्वरूज काढणे - मिटलेली भांडणे पुन्हा उकरून काढणे.
खाऊन माजावेटाकून माजू नये - अन्न खाल्ले तर शरीराच्या वाढीला उपयोग होतो. पण तेच अन्न टाकले तर त्याचा नाश होतो. सत्कार्य करताना त्याचा दुरूपयोग करू नये.
खिळ्यासाठी नाल गेलानालासाठी घोडा गेलाघोड्यासाठी स्वार गेलाएवढा अनर्थ खिळ्याने केला -थोड्याशा निष्काळणीपणामुळे भयंकर अनर्थ होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीनेही मोठे नुकसान होऊ शकते.
खोट्याच्या कपाळी गोटा किंवा कुन्हाडीचा घाव - जो मनुष्य वाईट काम करतो त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो.
खायचे दात वेगळेदाखवायचे वेगळे - मनात एक बाहेर दुसरेच रूप. (दुटप्पीपणाने वागणे.)
खाल्ल्या घरचे वासे मोजणे - ज्याच्यावर आपण उपकार करतो, त्याने आपल्याबद्दल वाईट चिंतणे, निमकहराम होणे.

गरजवंताला अक्कल नसते - एखाद्या संकटात सापडलेल्या गरजवंताला दुस-यांचे वाईट बोलणेही ऐकून घ्यावे लागते.
गरज सरो वैद्य मरो - गरज असे पर्यंतच एखाद्याची आठवण ठेवणे, गरज संपली की त्याला विसरणे.
गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार - आई वडिलांचे गुण नेहमी मुलांना येतात. (अनुवंशिक संस्कार त्याच्यावर होतात)
गर्जेल तो पडेल काय? (गर्जेल तो वर्षेल काय?) - केवळ बडबड करणा-या माणसाच्या हातून कोणतेही कार्य होऊ शकेल का?
गर्वाचे घर खाली - गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ - मुर्ख माणसे एकत्र जमली की त्यांच्या हातून वाईट कृत्ये होण्याचीच शक्यता जास्त असते.
गाढवाने शेत खाल्ल्याचे ना पाप ना पुण्य - दुर्जनावर उपकार केल्याने काही उपयोग होत नाही. आपलेच श्रम व्यर्थ जातात.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली - एखादे चांगले काम हाती घेतले तर त्याचा फायदाच होईल, तोटा नाहीच.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता - मूर्ख माणसाचे गोंधळ घालण्यात जितके मन रमते तितके चांगल्या गोष्टी ऐकण्यात किंवा करण्यात रमत नाही.
गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही, त्याचा फायदा करून घेण्याचे सामर्थ्य असावे लागते.
गाढवाला गुळाची चव काय माहीत ? - मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.
गाव करी ते राव न करी - एकजुटीने महान कार्य करता येते, ते पैशांनी ही होणार नाही. (एकीची महती.)
गाड्यावर नावनावेवर गाडा - सर्व दिवस सारखे नसतात. गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो व श्रीमंताचा गरीब.
गाड्याबरोबर नळ्याला यात्रा - मोठ्यांच्या आश्रयामुळे लहानांचाही अनायासे लाभ होतो.
गांवढ्या गावात गाढवी सवाष्ण - लहान गावात क्षुद्र माणसालाही महत्व प्राप्त होते. चांगल्या वस्तू नसल्यास टाकवू असल्या तरी चालतात.
गाठचा एक बाहेरच्या शंभराबरोबर - जे पूर्णपणे आपल्या ताब्यात आहे ते थोडेसे असले तरी त्याची योग्यता अधिक असते.
गुळावरल्या माशा किंवा सास्वरेवरले मुंगळे - जोपर्यंत एखाद्याचे उत्कर्षाचे दिवस असतात तो पर्यंतच त्याच्याभोवती मित्र जमतात.
गुरूची विद्या गुरूलाच - दुस-यांना फसविण्याचा प्रयत्न केल्यास स्वतः फसल्या शिवाय राहात नाही.
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबाला पैशाची मदत करणे अशक्य असले तरी गोड बोलणे शक्य असावे.
गोगलगाय आणि पोटात पाय - दिसायला गरीब पण असतो कपटी. आत एक आणि बाहेर दुसरेच.
गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य - दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.
गोरागोमटा कपाळ करंटा - दिसण्यात सुंदर पण नशीब वाईट.

घरोघरी मातीच्या चुली - सामान्यपणे प्रत्येकाच्या घरी सारखीच परिस्थिती असते.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - कुटुंबातील प्रमुख पुरूषावर संकट ओढवले तर त्याच्या आश्रितांचा सुद्धा त्याला साथ मिळू शकत नाही.
घघाची विद्या येते पर ददाची विद्या येत नाही - घेणे माहीत आहे पण देणे नाही.
घरचे झाले थोडेव्याह्याने धाडले घोडे - मनुष्याला स्वतःच्याच कामाचा व्याप अतोनात असताना दुस-यानी आपलेही काम त्याच्यावर लादणे.
घटका पाणी पितेघड्याळ टोले खाते - वेगवेगळ्या माणसांना आपापल्या कर्मानुसार सुखदुःखाचे अनुभव घ्यावे लागतात.
घर बांधून पहावे आणि लग्न करून पहावे (घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून) - घर बांधताना किंवा लग्न करताना कोणकोणती संकटे येतील व खर्च किती होईल हे काही सांगता येत नाही. (कोणतीही गोष्ट केल्याखेरीज त्यातील अडचणीची कल्पना येत नाही)
घराची ओज अंगण सांगते - एखाद्याच्या अंगणाची परिस्थिती पाहून त्याच्या घरातील टापटीपपणा समजतो.
घर ना दार देवळी बि-हाड - घरदार, बायको, मुलेबाळे, नसलेला एकुलता एक प्राणी.
घरासारखा पाहुणा होतोपण पाहुण्यासारखे घर होत नाही - पाहुण्याला घरच्यांच्या चालीरीती स्वीकाराव्या लागतात. घरच्याना पाहुण्याच्या चालीरीती स्वीकाराव्या लागत नाहीत.
घर सारव तर म्हणे कोनाडे किती ? - आपल्याला दिलेले काम सोडून भलत्याच गोष्टीची विचारपूस करणे.
घुसळती पेक्षा उकळतीच्या घरी अधिक - कष्ट करून पोट भरणा-या माणसांपेक्षा दुस-यांना लुबाडणारी माणसेच अधिक चैन करतात
घोडा मैदान जवळ आहे - परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे.
घोडे स्वाई भाडे - घोड्याच्या भाड्याचे पैसे घोड्याच्या गवतासाठी जातात, फायदा काहीच नाही. तसेच फायदा नसलेला धंदा करण्यात अर्थ नाही.

चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल - आपल्या उत्कर्षासाठी धडपड करीत असता कधी अपयश आले तर कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होतेच.
चालत्या गाडीला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात अडथळा निर्माण करणे.
चावडीवर दरवडा - ज्याला लोकांचे संरक्षण करावयाचे आहे त्याला स्वतःचेच रक्षण करता येत नाही.
चोराचे पाऊल चोर जाणे - (चोराची पावले चोरांस ठाऊक) - चोरांची दुष्कृत्ये चोरानाच माहीत असतात.
चोराच्या वाटा चोराला ठाऊक - चोराचे पाऊल चोर जाणे. चोरांची कृत्ये चोरांसच माहीत असतात.
चोराच्या मनात चांदणे - जो कोणी दुष्कर्म करतो त्याला ते उघडकीस येईल अशी सारखी भीती वाटत असते.
चोराच्या उलट्या बोंबा - स्वतः गुन्हा करून पुन्हा स्वतःच दुस-यांच्या नावाने आरडा ओरड करणे.
चोरावर मोर - चोरापासूनच चोरी करणारा सवाई चोर.
चोराच्या हातची लंगोटी - ज्याच्याकडून काहीही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडूनच काही मिळणे म्हणजे सुदैव.
चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे (फाशी देणे) - ख-या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा करणे.

छडी लागे म्म् विद्या येई घमघम् - शिक्षा केल्याने मुले अभ्यास करतात अशी जुन्या लोकांची समजून होती.

जनी जनार्दन - समाजाला जे प्रिय असते तेच परमेश्वरालाही प्रिय असते, बहुसंख्य लोकांचे म्हणणेच खरे मानावे.
जन्माला आला हेलापाणी वाहता मेला - बुद्धीच नसलेल्या माणसांच्या हातून कोणतेही काम धड होऊ शकत नसल्याने त्यांचा जन्म वाया जातो.
जगी सर्व सुखी असा कोण आहे ? - आपल्याला सर्व सुखे मिळणे अशक्य, त्यामुळे जे मिळते त्यातच सामाधान मानले पाहिजे.
जळते घर भाड्याने कोण घेतो ? - जी वस्तू स्वीकारल्याने आपले नुकसान होते हे स्पष्ट दिसत असता ती कोण स्वीकारील ?
जळात (पाण्यात) राहून माशांशी वैर - ज्यांच्या सहवासात आपल्याला राहावयाचे आहे तेथे सलोख्याने राहावे, देश निर्माण होईल असे काही करू नये.
जशी देणावळ तशी धुणावळ (दाम तसे काम) - पैसे जास्त दिले तर कामही चांगले होते.
जन्मा घाली तो भाकर देईच - जो आपल्याला जन्माला घालतो, तो आपल्या पालन पोषणाची जबाबदारी घेतोच.
जळत्या घराचा पोळता वासा - मोठ्या संकटात सापडलेल्या व्यक्तीकडून शक्य तेवढी मदत करून घेणे ही वृत्ती, त्याने सुद्धा त्याला दिलासा मिळतो.
ज्याची खावी पोळीत्याची वाजवावी टाळी - आपणावर जो उपकार करतो त्याच्याशी इमानदारीने वागावे, त्याच्याशी बेइमान होऊ नये.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - कोणत्याही गोष्टीची स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याची पूर्ण कल्पना येत नाही.
ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकाच ठिकाणचे लोक एकमेकांना पक्के ओळखून असतात.
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच रे - भलेपणा सर्वत्र कामाला येत नाही. कोणाचे चांगले केले तर तोच आपल्यावर उलटण्याची शक्यता असते.
ज्याचे कुडे त्याचे पुढे - दुस-यांचे वाईट करायला जो जातो त्याचेच वाईट होते.
ज्याचे मन त्याला ग्वाही देते - ज्याने पाप केले असेल त्याचेच मन त्याला खात असते.
ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल - जो स्वतः दुःखी असतो, तोच ते दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो.
जाईल तेथे हत्तीनाही तेथे मुंगी सुद्धा जाणार नाही - काही ठिकाणी कारण नसताना अधिक खर्च होतो, पण काही ठिकाणी अगदी क्षुल्लक गोष्टीतही काटकसर केली जाते.
ज्याच्या मनगटात जोर तो बळी - मनगटाचे बळ पैशाच्या किंवा अधिकाराच्या बळापेक्षा श्रेष्ठ असते.
जी खोड बाळा ती जन्मकाळा - बाळपणी लागलेल्या सवयी जन्मभर टिकतात.
जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही - एखाद्याला वाईट सवय लागली तर ती मरे पर्यंत जाणे अशक्य असते.
जिच्या हाती पाळण्याची दोरीती जगाते उद्धारी - मुलांचा सांभाळ करणारी माताच जगाचा उद्धार करू शकते.

झाकली मूठ सव्वा लाखाची - आपली परिस्थिती गुप्त असे पर्यंतच आपली प्रतिष्ठा राहते.

टाकीचे घाव सोसल्या विना देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
टिटवी देखील समुद्र आटविते - अशक्य गोष्ट दीर्घ परिश्रमाने शक्य होऊ शकते. क्षुल्लक माणूस सुद्धा परिश्रम करून पराक्रमाची कामे करू शकतो.

डोळ्यात केर आणि कानात फुकर - रोगाला अनुसरून उपाय न करता भलतेच उपाय करीत राहणे.
डोळे पापी - डोळ्याआड कितीही वाईट गोष्टी झाल्या तरी चालतात, पण डोळ्यादेखत एखादी क्षुल्लक चूक झाली तरी ती आपल्याला खपत नाही.
डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये - आपले वर्तन प्रामाणिकपणाचे असावे, पण त्याचा गर्वही करू नये, त्याबरोबरच स्वतःला कोणापुढे वाकण्याचा प्रसंगही येऊ देऊ नये.
डोंगर पोखरून उंदीर काढणे - डोंगरा एवढे (खूप) कष्ट करून लहानसा मोबदला मिळणे.
डोंगराचे आवळे व सागराचे (समुद्राचे) मीठ (लोणचे घालताना)- दोन असंभवनीय गोष्टी सुद्धा कधी कधी घडू शकतात.
डोळ्यापुढे काजवे दिसणे - खूप भीती वाटणे, त्रास होणे.
डोळ्यावर कातडे ओढणे - जाणून बुजून दुर्लक्ष करणे.

ढवळ्याशेजारी पोवळा बांधलावाण नाही पण गुण लागला - संगतीमुळे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.

तळे राखी तो पाणी चाखी - ज्याच्याकडे एखादे काम सोपविले तर तो त्यातून थोडा तरी फायदा करून घेतल्या शिवाय राहत नाही.
ताटात काय नि द्रोणात काय! - एकाच हित संबंधातील माणसांचा लाभ एकच
ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय एकच -एकाच हित संबंधातील माणसांचा लाभ एकच
तहान लागल्यावर विहीर खणणे - दूरदृष्टी नसणे, आयत्यावेळी कोणतीही गोष्ट होत नसते.
ताकाला जाऊन भांडे लपविणे - मनातील हेतू स्पष्ट न करता आढेवेढे घेऊन नंतर सांगणे.
ताकापुरते रामायण - आपले काम होईपर्यंतच दुस-याला सुष करणे.
तण खाई धन - वरवर क्षुल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते.
ता म्हणता ताकभात समजावा - थोड्याशा सांगण्यावरून सर्व गोष्टी अंदाजाने समजावून घेणे.
तापल्या तव्यावर भाकरी (पोळी) भाजून घ्यावी - संधीचा लाभ उठविणे.
ताटावरचे पाटावरपाटावरचे ताटावर - श्रीमंताच्या बायकांचा डौल व त्यामुळे आळस.
तीथ आहे तर भट नाहीभट आहे तर तीथ नाही - दोन आवश्यक गोष्टी पैकी एक अनुकूल असल्यास दुसरी नसणे.
तुला फें तुझ्या बापाला फें - दोघांची ही पर्वा न करणे.
तुम्ही आम्ही एककंठाळीला मे - महत्त्वाच्या गोष्टी सोडून एरव्ही सगळे सारखेच (एकच). (तोंड बंद केलेल्या पिशवीला मात्र हात लावायचा नाही.)
तुरूत दान महापुण्य - योग्य वेळी दानधर्म करणे किंवा देवाण घेवाण करणे केव्हाही चांगले. (तुरूत-त्वरीत)
तेरड्याचा रंग तीन दिवस - एखाद्या दुष्ट माणसाने चांगुलपणा दाखवला किंवा कोणी पोकळ श्रीमंतीचा भपका दाखवला तर तो फार काळ टिकत नाही.
तेल गेलेतूप गेलेहाती राहिले धुपाटणे - स्वताःच्या मुर्खपणामुळे दोन्ही कडून नुकसान होते व हाती काहीच राहत नाही.
तो पाप देणार नाहीतर पुण्य कोठून देणार? - एखादी वाईट गोष्ट सुद्धा दुस-याना न देणारा कंजूस माणूस चांगली गोष्ट कोठून देणार?
तोबाच्याला पुढेलगामाला मागे - (चुकारपणा करणे), खाण्यात पुढे, पण कामात मागे.
तोंड धरून बुक्क्यांचा मार - स्वतःचा अपराध असूनही दुस-याला विनाकरण शिक्षा करून त्यासाठी त्याला तक्रारही करू न देणे.
तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही - काहीतरी कष्ट केल्यावाचून फळ मिळत नाही. श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही.
तीळ खाऊन व्रत मोडणे - एखादा क्षुल्लक फायदा होणार म्हणून अयोग्य काम करणे.
तळहातास केस आले नाहीत - अजून काम करण्याची अंगात धमक असणे.
ताज्या घोड्यावरच्या गोमाशा - जोपर्यंत एखाद्याची भरभराट असते तोपर्यंतच त्याच्यापुढे स्तुती करणारेच लोक जास्त असतात.

थेंबे थेंबे तळे साचे - हळूहळू संचय करणे.
थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसांच्या आश्रयाचा प्रभावही मोठा असतो.

दगडाचा देव होत नाही - अंगी कर्तृत्व नसल्यास मोठेपणा मिळत नाही.
दगडावरची रेघ - खात्रीची गोष्ट.
दगडापेक्षा वीट मऊ - निरूपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानीचे म्हणून स्वीकारणे.
दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड - दगड म्हणा किंवा धोंडा म्हणा एक गोष्ट स्पष्ट आहे की ती वस्तू एकच आहे, वाटाघाटी करण्याचे काही कारण नाही.
दगडाचे पेव घालता चळवळकाढता वळवळ - निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे योग्य नाही.
दृष्टीआड सृष्टी - आपल्या मागे काय चालले आहे ते दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे.
दाम करी कामबिबी करी सलाम - पैसा आहे तर मान आहे, पैशाने खूपशी कामे पार पाडता येतात.
दांड्याने पाणी तोडले म्हणून निराळे होत नाही - लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी खरे मित्र वेगळे होऊ शकत नाहीत.
दात कोरून कोठे पोट भरत असते ? - मोठ मोठ्या व्यवहारात लहानशा काटकसरीचा कधी उपयोग होतो ?
दात आहेत तर चणे नाहीतचणे आहेत तर दात नाहीत -एक गोष्ट अनुकूल असली तर तिचा उपयोग करून घेण्यास आवश्यक असलेली दुसरी गोष्ट नसते.
द्यावे तसे घ्यावेकरावे तसे भोगावे - आपण चांगले काम केल्यास फळ ही चांगले मिळते.
दिवस बुडालामजूर उडाला - दुस-यांच्या कामाबद्दल कळकळ नसली म्हणजे ते काम यशस्वी होऊ शकत नाही (मनापासून काम न करणारा मनुष्य).
दिल में चंगा कथौटी में गंगा - आपले मन निर्मळ असल्यास आपल्या जवळ पवित्र गंगा असल्याप्रमाणेच होय.
दिव्याखाली अंधार - दिवा दुस-याना उजेड देत असला तरी त्याच्याखाली अंधारच असतो, तसेच चांगल्या माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो.
दगडाखाली हात सापडणे - अडचणीत असणे.
दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम स्वतःचे पैसे खर्च करून दुस-यांचे भांडण लावून देणे.
द्राविडी प्राणायाम - सोपे असलेले काम कठीण करून करणे.
दुधाने तोंड भाजलेतो ताक सुद्धा फुकून पितो - एकदा अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीत सुद्धा काळजी घेतो.
दुरून डोंगर साजरे - अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते, पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.
दुष्काळात तेरावा महिना - संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे.
दुभत्या गाईच्या लाथा गोड - आपल्याला ज्याच्यापासून फायदा होतो, त्याने आपला कितीही तिरस्कार केला तरी तो मुकाट्याने सोसणे.
दुस-याच्या डोळ्यात भसकिनी बोट शिरते - दुस-यांच्या दोषांवर टीका करावयास मनुष्य नेहमी तयार असतो.
दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसतेपण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही - दुस-यांची क्षुल्लक चूक असली तरी ती दिसते, पण स्वतःच्या अंगी असलेला मोठा दोष दिसत नाही.
दुधात साखर - चांगल्या गोष्टी घडलेल्या असताना आणखीन चांगल्या गोष्टीची भर पडणे.
देवल्या देवा दंडवत - समोर दिसले म्हणून केलेले काम मनापासून होत नाही.
दे माय धरणी ठाय - अतिशय त्रास होणे.
देणे नास्तिघेणे नास्ति - देण्याघेण्याचा कोणताही व्यवहार न करणे.
देश तसा वेश - परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे.
देह त्यागिता कीर्ती मागे उरावी - एखाद्याचे मरणानंतर देह नष्ट होतो, पण त्याने केलेल्या चांगल्या गोष्टीची मात्र कायम लोकांच्या मनात आठवण राहते.
दैव देते पण कर्म नेते - सुदैवाने एखादी गोष्ट लाभते, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसानही होऊ शकते.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी - दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणून नेहमी फसतो.
दोन डोळे शेजारीभेट नाही संसारी - जवळ असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध न होणे.

धर्म करता कर्म उभे राहते - दुस-यावर उपकार करावयास जाऊन स्वतःवरच संकट ओढवून घेणे.
धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा - एखाद्या वस्तूवर ज्याचा हक्क आहे, ती वस्तू त्याला न मिळता भलत्याच माणसाला मिळणे किंवा त्याचा उपभोग होणे.
धर्माचे गाई आणि दात कामे नाही - फुकट मिळालेल्या वस्तूला कधीही नावे ठेऊ नये.
धर्मावर सोमवार सोडणे - स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.

नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तूचे आकर्षण थोडेच दिवस टिकते. (नव्याची नवलाई)
न कर्त्याचा वार शनिवार - एखादे काम मनापासून करायचे नसले की कोणते तरी क्षुल्लक कारण सांगून ते काम टाळणे.
नवरा मरो की नवरी मरोउपाध्यायाला दक्षिणेशी कारण -पुढे बरे वाईट कोणते ही परिणाम होवोत तुर्त स्वार्थाचाच विचार करावयाचा.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने - दोषाने युक्त असलेले काम करीत असता एकामागून एक अशा अनेक संकटाना तोंड द्यावे लागते.
नकटे व्हावे पर धाकटे होऊ नये - लहानाला सर्व सोसावे लागते. व्यंग असले तरी बरे, लहानपण त्याहून वाईट, परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण लाचार होऊ नये.
न खात्या देवाला नैवेद्य - जो काही घेणार नाही याची खात्री आहे त्यालाच देण्याचा आग्रह करणे.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये - पूज्यपणा किंवा पवित्रता ह्या सर्व गोष्टी एखाद्याच्या पूर्व परंपरेवर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या गुणावर किंवा चारित्र्यावर अवलंबून असतात.
खाने काम होतेतेथे कु-हाड कशाला ? - एखादे काम क्षुल्लक साधनाने किंवा थोडीशी शक्ती वापरल्याने होऊ शकते, तेथे मोठे साधन किंवा पुष्कळ शक्ती वापरण्याचे कारण काय?
नवी विटी नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे.
नरहरदेवाची पालखी - ज्यावर कोणा एकाची सत्ता नसते किंवा एकावर जवाबदारी नसते, पण सर्वांनी हातभार लावल्यास ते काम पूर्ण होण्यासारखे असते. लोकांच्या मर्जीनुसार घडणारे काम.
नाक दाबले म्हणजे तोंड उघडते - एखाद्याला पेचात अडकविल्या शिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे कबून करणार नाही.
नावडतीचे मीठ अळणी - नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती वाईटच दिसते.
नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाहीत - कर्तृत्ववान मनुष्य परिस्थितीने कितीही खालावला तरीही नादान माणसापेक्षाही अधिक योग्यतेचा असू शकतो.
नाचता येईना अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम येत नसल्यास स्वतःचा कमीपणा लपविण्यासाठी संबंधीत दुस-या गोष्टीतील दोष दाखविणे.
नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी असली तरी, कृती मात्र नावाला खोटेपणा आणणारी.
नाका पेक्षा मोती जड - एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तुपेक्षा अधिक महत्त्व द्यावयाचे.
नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा - नाव मोठे पण कर्तृत्व मात्र हलक्या दर्जाचे.
नालासाठी घोडा मेला - लहानशी चूक वेळेवर सुधारली नाही तर पुढे त्याच चुकीमुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे - एकाला लुबाडून आणलेल्या पैशाने दुस-याला खुष करणे.
नाकाने कांदे किंवा वांगी सोलणे - ऐट मिरवणे, वाईट कर्मे करूनही न केल्याचा आव आणणे.
न भूतो न भविष्यति - पूर्वी कधी झाली नाही व पुढेही कधी होणार नाही अशी अपूर्व गोष्ट.

पळसाला पाने तीनच - सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.
पडलेले शेण माती घेऊन उठते - चांगल्या मनुष्यावर एखादा आरोप आला, आणि त्याने सर्वांशी विचार विनिमय करून त्याचे निरसन केले, तरी त्याची थोही तरी बदनामी होतेच.
परदुः शीतल - दुस-यांच्या दुःखाची खरी कल्पना लोकांना नसते म्हणून त्यांना त्या दुःखाची तीव्रता जाणवत नाही.
पळणा-यास एक वाटशेधणा-यास बारा वाटा - लबाडी करणे सोपे असते. पण ती शोधून काढणे कठीण असते.
पडत्या फळाची आज्ञा - तात्काल मान्यता देणे.
पदरी पडलेपवित्र झाले - कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे न ठेवता तिच्या बाबतीत समाधान मानावे.
परसातली भाजी - श्रम न करता सहजपणे मिळणारी गोष्ट.
पंढरीची वारी - सामान्यपणे वारंवार होणारी वेप.
पराय घरपर लक्ष्मी नारायण - (आइजीच्या जिवावर बाइजी उदार) दुस-यांच्या जिवावर गंमत करणारा.
पंचप्राणाची आरती ओवाळणे - एखादे काम अगदी मनापासून करणे. (मनांतील सर्व भावनेने आरती ओवाळणे).
पाचामुस्वी परमेश्वर - अनेक लोक सांगतात तेच खरे मानावे.
पालथ्या घड्यावर पाणी - एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे.
पादर्‍याला पावट्याचे निमित्त - एखादा मनुष्य आपल्या वर्तनाला निमित्तच शोधू लागला, तर ते त्याला कोठे ही सापडू शकेल.
पायातली वहाण पायात बरी - प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे.
पाचही बोटे सारखी नसतात - कोणतीही एक गोष्ट दुस-या गोष्टी सारखी असू शकत नाही. सर्व माणसे सारख्या स्वभावाची असू शकत नाहीत.
पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे - जे काम आपल्याला करावयाचे आहे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव करणे.
पाण्यात काठी मारली तरका पाणी दोन जागी होते? -दृढ मैत्री क्षुल्लक कारणाने तुटते का?
पायाखाली मुंगी मरणार नाही - अतिशय सावकाश चालणारा माणूस किंवा अत्यंत निरुपद्रवी माणूस.
पाठीवर मारापोटावर मारू नका - शारीरिक शिक्षा करवी, पण पोटापाण्याचे कमी करू नये.
पिंडी ते ब्रह्मांडी - आपल्यावरून जग ओळवावे.
पिशाचाच्या हातात कोलीत - (आधीच मर्कट तशातही मद्य प्याला). वाईट माणसांच्या हातात वाईट काम करावयास दिले तर ते वाईटच होणार
पी हळदहो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करू नये.
पुढच्याला ठेच मागचा शहाणा - दुस-यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन मनुष्य स्वतः शहाणा होतो व सावधगिरीने वागतो.
पुढे पाठ मागे सपाट - पुढचे धडे शिकत असता मागच्या धड्यातील महत्त्वाच्या गोष्टी विसरणे.
पुराणातली वांगी पुराणात - जुने रीतीरिवाज आज उपयोगी पडतीलच असे नाही. उपदेश तिथेच राहतो. मनुष्य स्वतःच्या लहरीप्रमाणे वागू लागतो.
पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल - जी अशक्य गोष्ट असते ती सुद्धा शक्य होऊ शकते. पुढे तिखट मागे पोचट - आरंभी मोठ्या बढाया मारणारा माणूस मागून कृतीच्या वेळी माघार घेतो.
पैजेचा विडा उचलणे - प्रतिज्ञा करणे.
पैठणी आदर - प्रेम - आग्रह - पोकळ आदर, वरवर दाखविलेला आदर किंवा प्रेम.
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा - थोडेसे देऊन त्याबद्दल खूप काम करून घेणे.
पोटात एक ओठात एक - लबाड माणसांचे विचार अनेक असतात. त्यांच्या मनात एक असते व बोलतात दुसरेच.
पोटात धोंडा उभा राहणे - अतिशय भीती वाटणे.
पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये - शरण आलेल्या माणसाला स्वतःचे मूल द्यावे पण भावडे देऊ नये. ज्यावर आपली सत्ता आहे त्याचाच वापर करावा.
पोट पाठीस लागलेच आहे - पोटाला मिळविण्यासाठी सर्वांनाच उद्योग करावा लागतो.

फार झालेहसू आले - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तिची सवय पडून पुढे काही वाटेनासे होते.
फासा पडेल तो डावराजा बोलेल तो न्याव - राजाने दिलेला न्याय सत्याच्या व प्रजाहिताच्या उलट असला, तरी तो नाइलाज म्हणून पत्करावा लागतो.
फुटका डोळा काजळाने साजरा करावा - आपल्या अंगी असलेला दोष नाहीसा करणे शक्य नसेल तर त्याचा शक्य होईल तितका उपयोग करून घ्यावा.
फुले विकली तेथे गोवच्या विकणे - ज्या ठिकाणी मोठ्या प्रतिष्ठेने दिवस घालविले, त्याच ठिकाणी हलकी सलकी कामे करण्याचा प्रसंग येणे.
फूल ना फुलाची पाकळी - जितके आपल्याला द्यायला पाहिजे तितके देणे जमत नसल्यास शक्य आहे तेवढेच देणे.
फासा सोईचा पडणे - अनुकूल गोष्ट घडणे.
फासा उलटा पडणे - प्रतिकूल गोष्ट घडणे.

बळी तो कानपिळी - ज्या मनुष्याच्या अंगी पैशाचे, अधिकाराचे, वशिल्याचे व शक्तीचे बळ असते, तो इतराना छळतो किंवा त्यांच्यावर सत्ता चालवितो.
बसता लाथ उठता बुक्की - नेहमी शिक्षा करीत असणे.
बडा घर पोकळ वासा - (नाव मोठे लक्षण खोटे)- दिसण्यात श्रीमंती. पण प्रत्यक्षात काही नसते.
बारभाईची खेतीकाय लागेल हाती - अनेक लोकांवर सोपविलेली जबाबदारी कोणीच नीट पार पाडू शकत नाहीत.
बाप तसा बेटा - जे वडिलांच्या अंगी चांगले किंवा वाईट गुण असतील ते मुलाच्या अंगी उतरणे, (वडील तसा मुलगा).
बावळी मुद्रा देवळी निद्रा - एखादा माणूस दिसायला बावळट असला तरी व्यवहारात तो चतुर असतो.
बापाला बाप म्हणेनातर चुलत्याला काका कसा म्हणेल? - जो मनुष्य जवळच्या नातेवाईकांना ओळखू शकत नाही, तो दूरच्यांना कसा ओळखेल?
बापशेटीची पेंड (बापशेट श्रीमंत व उदार गृहस्थ) - ज्यांना पाहिजे त्यांनी ती वस्तू नेणे.
बाबया गेला आणि दशम्याही गेल्या - दोन्ही गोष्टी मिळण्यासारख्या नाहीत.
बाप दाखवनाहीतर श्राद्ध कर - एखाद्याला हरलो असे कबूल करायला लावून स्वतःचे मत त्याच्यावर लादणे व त्याला अडचणीत घालणे.
बायकात पुरूष लांबोडा - बायकांच्या घोळक्यात पुरुषानी जाणे योग्य नसते.
बाजारात तुरी भट भटणीला मारी - जी गोष्ट अजून घडायचीच आहे तिच्याबद्दल अगोदरच व्यर्थ वाद घालीत बसणे योग्य नाही.
बाजीरावाचा नातू - मिजासखोर माणूस.
बारा पिंपळावरचा मुंजा - एके ठिकाणी स्थिर न होणारा व सदा हिंडत असणारा माणूस.
बारा बंदराचे पाणी प्यालेला - अनुभविक माणूस, अनेक देश फिरून चतुर बनलेला.
बारा घरचे बारा - भिन्न भिन्न स्थळांचे व भिन्न भिन्न अनुभवाचे लोक काही कार्याकरिता एके ठिकाणी जमतात ते.
बुडत्याचा पाय खोलात - ज्याचा अपकर्ष (उत्कर्ष x अपकर्ष) व्हायचा असतो त्याला सतत एकामागून एक अशा येणा-या संकटाना तोंड द्यावे लागते.
बुगड्या गेल्यापण भोके राहिली - एखाद्याचे पूर्वीचे वैभव गेले तरी त्याच्या खुणा मागे राहिल्या.
बुडत्याला काडीचा आधार - मोठ्या संकटात सापडलेल्या माणसाला वेळप्रसंगी कोणी थोडीशी मदत केली तरी त्याला महत्त्व असते
बैल गेला नि झोपा केला - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
बैल गाभणा तर म्हणे नववा महिना - एखाद्या माणसाकडून कार्य करवून घ्यायचे असेल तर तो कितीही वेडेपणाचे बोलला तरी त्याला खूष करण्यासाठी 'हो' म्हणावयाचे.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - आपल्या बोलण्याप्रमाणे जो वागतो त्या माणसाला मान दिला पाहिजे.
बोलेल तो करील काय - बडबड करणा-या माणसाकडून कोणतीही गोष्ट होऊ शकेल काय?
बोलाफुलास गाठ - आपण एखाद्या गोष्टीविषयी बोलत असतानाच ती घडणे. म्हणजेच एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडणे.
बोलणा-याचे तोंड दिसतेकरणा-याची कृती मात्र कोणाला दिसत नाही - रागावणा-या माणसाचे शब्द सर्वांना ऐकू येतात, पण ज्याला रागवतो त्याने केलेली चूक किंवा कृती मात्र कोणाला दिसत नाही.
बोलाचीच कढी व बोलचाच भात - नुसतीच बडबड. कृती मात्र काहीच नसते.
बिगारीचे घोडेतरवडाचा फोक - (बिगार-पैसे न देता करून घेतलेले काम) (तरवड-झाड, फोक-सरळ फांदी) - दुस-यांच्या वस्तूची काळजी सहसा कोणी घेत नाही.

भटाला दिली ओसरीभट हातपाय पसरी - मागणा-या मनुष्याला एखादी वस्तू दिली तर तो तृप्त न होता जास्तच मागत असतो.
भरवशाच्या म्हशीस टोणगा - ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याने आयत्या वेळी दगा देणे.
भरल्या गाड्यास सूप जड नाही - एखाद्याच्या अंगावर अनेक कामांचा बोजा असतो. त्याच्या अंगावर आणखीन थोडे काम येऊन पडले तर तो घाबरत नाही.
भांडणाचे तोंड काळे - भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो.
भाड्याचे घोडे ओझ्याने मेले - स्वतःच्या वस्तूसारखी भाड्याच्या वस्तूची कोणी काळजी घेत नाही.
भिंतीना कान असतात - दुस-यानी ऐकण्याची शक्यता असते म्हणून नेहमी सावधगिरीने बोलावे.
भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस - भित्रा माणूस भीतीचे कारण नसताना सुद्धा घाबरत असतो.
भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही - दुस-यावर अवलंबून असणारा माणूस मोठे कार्य करू शकत नाही.
भीक नको पण कुत्रा आवर - एखाद्याने उपकार केले नाही तरी चालतील, पण मार्गात विघ्न (अडथळे) मात्र आणू नये.
भीड भिकेची बहीण - भिडस्तपणाने माणसाचे फार नुकसान होते.
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा - अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते.

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - दुस-यांच्या मेहरबानीमुळे मिळालेल्या सवलतीचा दुरूपयोग करू नये.
मन जाणे पापा - आपण पाप केले आहे की नाही, हे प्रत्येकाचे मनच स्वतःला सांगत असते.
मन राजा मन प्रजा - कोणाचेही बरे वाईट करणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते.
मन चिंती ते वैरी न चिंती - कधी कधी आपल्या मनात जेवढ्या वाईट गोष्टी येतात तेवढ्या शत्रूच्याही मनात येत नसतील.
मनात मांडे पदरात धोंडे - फक्त मनात मोठमोठी मनोराज्ये करायची, पण प्रत्यक्षात मात्र पदरात काही पडत नसते.
मनाएवढी ग्याही त्रिभुवनात नाही - मनासारखा खरे सांगणारा साक्षीदार सा-या दुनियेत सापडणारा नाही.
मनास मानेल तोच सौदा - आपणास आवडेल तोच सौदा करावा. कोणी विरोध केल्यास तिथे दुर्लक्ष करावे.
मनी वसे ते स्वप्नी दिसे - एखादी गोष्ट व्हावी असे आपल्या मनाला सारखे वाटत असते. तीच प्रबळ इच्छा आपल्या स्वप्नाच्या रूपाने पूर्ण झालेली असते.
मनात एक जनात एक - मनात एक गोष्ट असते, पण बाहेरून निरळीच दाखविली जाते. (दुटप्पीपणा)
मरावे परी कीर्ती रूपी उरावे - मनुष्य देहाने मरतो. पण त्याने केलेल्या चांगल्या कामाच्या रूपाने जीवंत राहतो.
मनाची नाहीपण जनाची तरी ठेवावी - एखादी चूक केल्यावर दुस-यांच्या पुढे त्याची लाज तरी वाटावी.
मळमळीत (मिळमिळीत) सौभाग्यापेक्षा झळझळीत वैधव्य बरे - ज्या स्त्रीला नव-याने टाकलेले असते तिची स्थिती एखाद्या विधवेपेक्षाही कठीण असते.
मस्करीची होते कुस्करी - थट्टेचा परिणाम काही वेळा भयंकर होऊन त्याचे भांडणात रूपांतर होते.
मनात पाल चुकचुकणे - शंका येणे, संशय उत्पन्न होणे.
मातीचे कुल्ले लावल्याने लागत नाहीत - परक्या माणसाला आपला असे नुसते म्हणून तो आपला होत नाही. प्रेम स्वाभाविक असेल तरच ते टिकते.
माझे जेवण चुलीत- बाह्यतः- निरिच्छपणा दाखविणारी माणसे कधी कधी लबाडही असू शकतात.
मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना - आपला सन्मान झाला तर तो लोकांना सांगावा, पण अपमान झाला त्याची वाच्यता न करता मनातल्या मनांतच ठेवावा.
मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ? - एखादी दिसण्यात सोपी व करण्यास कठीण अशी गोष्ट कोणी सहसा करायला पुढे येत नाही.
मांजराचे पाय कुत्र्यावर करणे - काहीतरी गडबड करून आपली सुटका करून घेणे.
मारणारयाचा हात धरवतोपण बोलणान्याचे तोंड धरवत नाही - एखाद्या धडधाकट माणसास आवरणे सुध्दा सोपे असते, पण मनात येईल ते वाईट असे काहीतरी बोलणा-या माणसास गप्प करणे कठीण असते.
मागून आलेले लोण पुढे पोचविणे - मागून चालत आलेल्या चालीरिती तशाच पुढे चालू ठेवणे.
मानला तर देव नाहीतर धोंडा - एखाद्याचा मान ठेवला तर ठेवला नाहीतर नाही.
म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात - आपलीच माणसे आपल्याला जड वाटत नाहीत.
म्हातारीने कोंबडे झाकून ठेवले म्हणून उजेडावयाचे राहत नाही - ज्या गोष्टी व्हावयाच्या असतात त्या एखाद्या क्षुल्लक कारणाने थांबवता येत नाहीत.
माशाने गिळलेला माणिक - कधीही भरून न येणारी हानी.
माळ दुस-यांच्या गळ्यात घालणे - आपले सर्वस्व त्याला अर्पण करणे.
मागुन पुढून बाप नवरा - जे काही येईल ते स्वतःच घ्यावयाचे, दुस-याला काही मिळू द्यावयाचे नाही अशी प्रवृत्ती असणे.
मिशा मूठ भर दाढी हातभर - (नाकापेक्षा मोती जड) मुख्य वस्तुपेक्षा तिचे गौण अंगास जास्त महत्त्व देणे.
मुंगी होऊन साखर खावीहत्ती होऊन लाकडे फोडू नये -नम्रपणे वागून आपला फायदा करून घ्यावा, ताठरपणाने वागून दुःख भोगू नये.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहानपणीच मोठेपणीच्या कर्तृत्वासंबंधी किंवा गुणदोषासंबंधी अंदाज लागतो.
मुसळाला अंकुर फुटणे - अशक्य म्हणून मानली गेलेली गोष्ट घडून येणे.
मूठभर मिशा हातभर दाढी - एखाद्याचा एकच अवयव प्रमाणाबाहेर असतो, तेव्हा त्याच्या बेडौलपणाचा उपहास करतात.
मेले मेंढरू आगीला भीत नाही - एखाद्याची एकदा अब्रू गेली की त्याला बेअब्रूची भीती वाटेनाशी होते.
मेल्या म्हशीला मणभर दूध - मुनष्य जीवंत आहे तोपर्यंत त्याच्या गुणाचे चीज होत नाही. तो मरण पावला म्हणजे त्याचे ते गुण वाढवून त्याची प्रशंसा केली जाते.
मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते - अंगी योग्य गुण असल्याशिवाय अनुकरण करणे अयोग्य.

यथा राजा तथा प्रजा - अधिकारावरील लोक जसे वागतात, तसेच सामान्य लोकही वागतात.
या कानाचे त्या कानास न कळू देणे - अतिशय गुप्त ठेवणे.
या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे - काहीतरी लबाडी करून वस्तूचे स्वरूप निरनिराळे करून दुस-याना फसविणे.
येवढ्याशा तेवढ्याशावरून - अगदी थोडक्याशा कारणावरुन.
ये रे माझ्या मागल्याताक कण्या चांगल्या (कण्या भाकरी चांगल्या) - एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पुर्वीप्रमाणेच वागणे.

रात्र थोडी सोंगे फार - वेळ अपुरा, पण काम मात्र भरपूर.
राजा बोले दळ हालेकाजी बोले दाढी हाले - समर्थ माणसांच्या शब्दाला मान मिळतो, क्षुल्लक माणसाच्या शब्दाला मिळत नाही (समर्थाचे श्वान, त्याला सर्व देती मान).
राजाला दिवाळी काय माहीत - जो मनुष्य नेहमी सुखात असतो त्याला अमकाच एक दिवस आनंदाचा असा नसतोच.
राज्याअंती नरक आणि नरकाअंती राज्य - पापे केल्यावाचून राज्य प्राप्त होत नाही आणि राज्य चालविणे आणि टिकविणे पापे केल्याशिवाय शक्य होत नाही. म्हणून शेवटी नरकात जावे लागते.
रिकामा न्हावीभिंतीला तुंबड्या लावी - रिकामा उद्योग करीत बसणे.
रोज मरे त्याला कोण रडे - रोजच संकटे येऊ लागली की त्याचे काहीच वाटेनासे होते.

लकडी वाचून मकडी वठणीस येत नाही - व्दाड माणसाला सुधारण्यास कडकच उपाय योजावे लागतात.
लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. दुस-यांच्या श्रीमंतीचा आपल्याला फायदा नसतो.
लष्कराच्या भाकरी भाजणारा - निष्कारण दुस-यांच्या उठाठेवी करणारा.
लाथ मारीन तेथे पाणी काढीन - सामर्थ्यवान व हुशार मनुष्य.
लाज नाही मना कोणी काही म्हणा -निर्लज्ज माणूस दुस-यांच्या टीकेची पर्वा करीत नाही.
लाडे लाडे केले वेडे - मुलाचे फार लाड केले म्हणचे ते वेडे चाळे करू लागते.
लेकीस बोले सुनेस लागे - एकाला उद्देशून पण दुस-याला लागेल असे बोलणे.
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण - इतरांना उपदेश करायचा, आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

वराती मागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकावरचा राग दुस-यावर काढणे.
वडाची साल पिंपळाला लावणे - ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगणे.
वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही - हलक्या माणसाने कितीही थोर होण्याचा प्रयत्न केला तरी ते होणे शक्य नाही.
वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी माणसात थोडासा शिकलेला माणूस ही पंडित म्हणून घेतो.
वाघ म्हटले तरी खातोवाघोबा म्हटले तरी खातो -एखाद्याशी उर्मटपणाने वागणे किंवा सौम्यपणाने वागणे दोन्ही सारखेच व्यर्थ ठरते.
वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही - सरळ मार्गाने योग्य कार्य साधत नसेल तर वक्र मार्गाचा अवलंब करावा लागतो.
वारा पाहून पाठ द्यावी - देश, काल, वर्तमान पाहून वर्तन (वागणूक) करीत रहावे.
वळणाचे पाणी वळणानेच जाणार - निसर्ग नियमाप्रमाणेच सर्व गोष्टी होतात.
वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे - सर्व गोष्टींची संधी आली असता, होईल तो फायदा करून घ्यावा.
वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ - पैसे दानधर्म केले तर पुण्यसंचय होईल, तेच आपल्याजवळ राहिले तर आपल्यालाच उपयोगी पडतील.
वा-यावर वरात आणि दर्यावर घाला - बेजबाबदारपणे काम करणे.
वाणला तितका घाणला - एखाद्याची जितकी जास्त स्तुती करावी तितका अधिक तो बिघडण्याची शक्यता.
व्याप तितका संताप - जितका पसारा जास्त असतो, तितकी अधीक काळजी असते.
विंचवाचे बि-हाड पाठीवर - निश्चित निवारा नसणे, थोडासाच संसार नेहमी आपल्या बरोबर बाळगणे.
विटले मन आणि फुटले मोती सांधत नाहीत - एखादी वस्तू आपल्याला आवडेनाशी झाली की पुन्हा आवडती होणे शक्य नसते.
विशी विद्या तिशी धन - एखाद्या माणसाला विद्या कितपत आली याचा अंदाज वीस वर्षानंतर व पैसा कितपत कमाऊ शकेल याचा अंदाज तीस वर्षानंतर करता येतो.
विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे - आपल्या मागे मुद्दाम काहीतरी उपद्व्याप किंवा लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणे.
व्यक्ती (मूर्ती) तितक्या प्रकृती - माणसा माणसांच्या स्वभावात फरक असतो.

शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दांनी समज दिली तरी पुरेसे असते.
शिकाविलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार वेळ पुरत नाही - मनुष्याला उपजत बुद्धीच पाहिजे. दुस-याने दिलेले पुरत नाही.
शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची कल्पना करता येते.
शिळ्या कढीला ऊत आणणे - जुन्या गोष्टीला नवे स्वरूप देऊन किंवा स्मरणातून गेलेले प्रसंग उकरून काढून, त्याबद्दल वाटाघाटी करणे.
शिंक्याचे तुटले बोक्याचे पटले - अकल्पित रीतीने एखादी गोष्ट झाली व त्याच्यामुळे एखाद्याला पाहिजे होते, ते आयतेच मिळणे.
शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? - दुस-यानी (शेजारणीने) कितीही दिले तरी आपले मन तृप्त होऊ शकेल काय ?
शेळी जाते जिवानिशीखाणारा म्हणतो वातड - कष्ट करणारा कष्ट करीत राहतो. पण ज्याच्यासाठी कष्ट करतो त्याला त्याचे काहीच वाटत नसते. उलट तो दोषच काढीत असतो.
शेंडी तुटोकी पारंबी तुटो - कसलाही प्रसंग आला तरी, किती अडचणी किंवा संकटे आली तरी, जिवावर उदार होणारा माणूस धाडसी व दृढनिश्चयी असतो.
शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा वरच्या प्रतीचा, एक वस्ताद तर दुसरा त्याहून सरस.
शीर सलामत तर पगड्या पचास - जिवंत राहिलो तर पैसे कसेही मिळविता येतात.

षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे - एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केल्याने कार्यनाश होतो. दोन माणसात एखादी गोष्ट गुप्त राहू शकते, पण तीन माणसात तीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही.

सत्तेपुढे शहाणपणा नाही - ज्याच्या हाती अधिकाराचे बळ असते, त्याच्यापुढे शहाण्या माणसाचे काही चालत नाही.
सरड्याप्रमाणे घटकेत तीन रंग पालटणे - वरचेवर आपले स्वरूप बदलत राहणे.
सरड्याची धाव कुंपणापर्यंत - अल्प बद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही - स्वतः अनुभवल्या शिवाय एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना येत नाही.
सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व काम व्यर्थ होते.
समुद्राच्या खार्‍या पाण्याने तोंड धुवून ये - एखादी गोष्ट आपणाला करावयाची नसली, आणि ती करण्याविषयी एखाद्याचा फार आग्रह असला तर काहीतरी भलतीच अट घालून आपले काम टाळणे.
सरासरी गुडघाभर पाणी - ‘सरासरी' ही पुष्कळ वेळा फसवणूक करणारी गोष्ट असते.
सारी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही - सर्व प्रकारच्या स्थितीची जुळवाजुळव करता येते, पण श्रीमंतीची बतावणी करता येत नाही.
समुद्रात जाऊन कोरडा - अनुकूल परिस्थिती असून सुद्धा एखाद्याने स्वतःचा फायदा करून न घेणे.
सगळ्या गलबतात अर्धी सुपारी माझी - भलतीच एखादी मागणी करून तिच्यासाठी हट्ट धरून बसणे.
सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा - सांगकाम्या, सांगितलेले काम व दिलेले वेतन मुकाट्याने घेणारा.
साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीची अनुकूलता असते.
साखरेवरले मुंगळे - जोपर्यंत आपले उत्कर्षाचे दिवस असतात तोपर्यंत मित्र गोळा होतात.
साप म्हणून दोरखंड झोडपणे - (साप साप म्हणून भुई धोपटणे) - एखाद्यावर निष्कारण आळ घेऊन शिक्षा करणे.
सांग काम्या ओ नाम्या - सांगेल तेवढेच काम करणे.
सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश पत्करणे योग्य नाही.
सुंभ जळेल पण पीळ जळणार नाही - हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.
सुताने स्वर्ग गाठणे - क्षुल्लक गोष्टीवरून नको त्या गोष्टींचा उठाठेव करणे.
सोन्याहून पिवळे- फारच उत्तम.
सोनाराने कान टोचणे - तिर्‍हईताने कान उघडणी करणे.
सोन्याचा धूर निघणे - अतिशय संपत्तीमान होणे.
स्वर्ग दोन बोटे उरणे - वैभवाचा कळस झाल्यासारखे वाटून गर्व होणे.
संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून तयारी - एखादे कार्य करावयाचे झाल्यास त्याची अगदी प्राथमिक अवस्थपासून सुरूवात करणे.

हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते - आजार किंवा विपत्ती येताना लवकर येतात, पण जाताना सावकाश जातात.
हजीर तो वजीर - जो ऐन वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.
हत्ती दारात झुलणे - एखाद्याची स्थिती वैभव संपन्न असणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - दुस-याची वस्तू परस्पर तिस-याला देणे, (स्वतःला झीज लागू न देणे).
हत्ती गेला पण शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा भाग व्हायचा राहिला.
हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट घेऊन मिळविलेले द्रव्य झपाट्याने नाहिसे होते.
हरी जेवण आणि मठी निद्रा - स्वतःचे घरदार सोडून कोठे तरी जेवायचे आणि कोठे तरी झोपायचे.
हसतील त्याचे दात दिसतील - लोकांच्या हसण्याची पर्वा न करणे. हात ओला तर मित्र भला - जोपर्यंत मनुष्य दुस-याला काही ना काही देऊ शकतो तोपर्यंत त्याच्याशी सगळे मित्रत्वाने वागतात.
हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये - जे खात्रीने आपले आहे ते सोडून जे अनिश्चित आहे ते मिळविण्याच्या नादी लागू नये.
हातच्या काकणाला आरसा कशाला - जी गोष्ट स्पष्ट किंवा उघड आहे ती दाखविण्यासाठी पुराव्याची जरूरी लागत नाही.
ह्या हाताचे याच हातावर - (येथल्या येथेच) वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे आणि तोंड फिरे तिथे अवदसा फिरे - उद्योगशील मनुष्याच्या घरी संपत्ती नांदते, उद्योग न करता नुसती वटवट करतो त्याच्या घरी दारिद्र्य येते.
हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
हात दाखवून अवलक्षण - शहाणपणा दाखविण्यासाठी बोललेली गोष्ट अंगाशी येते.
हाती धरल्या रोडकाआणि डोई धरल्या बोडका -ज्याच्यापासून कोणत्याही उपायानी काहीही प्राप्त व्हावयाचे नाही.
हां हां म्हणता - अत्यल्प काळात.
हिरा तो हिरा आणि गार ती गार - साधू कितीही विपन्न स्थितीत असला आणि दुष्ट किती ही वैभवशाली असला तरी ही मनाच्या उदारतेवरून साधू आपणास सहज ओळवता येतो.


Comments

  1. म्हणी- अर्थ व वाक्यात उपयोग



    १. चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.






















    २२. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी.





    २३. झाकली मुठ सव्वालाखाची - आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.






    २४. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही.





    २५. तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.






    २६. थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.




    \

    २७. दाम करी काम - पैश्याने सर्व कामे साध्य होतात.






    २८. दिव्याखाली अंधार - मोठया माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच .



    २९. दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.







    ३०. नाचता येईना अंगण वाकडे - आपल्यातील उणपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.




    pls answer them all not other answers expect the relevant will be reported it is marathi only they will answer




    i will mark the brainliest


    i have given the meaning use them in sentences

    ReplyDelete
  2. थोडे थोडे जमून मोठा संचय करणे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार