शब्दसिद्धी

शब्दसिद्धी 

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.       
शब्दांचे दोन प्रकार आहेत.      
१) सिद्ध शब्द  
२) साधित शब्द       

१) सिद्ध शब्द :-        

शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.      
सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.           
उदा.
ये, जा, पी, उठ, कर, गा इ.            

सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-   

अ) तत्सम शब्द -          

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. 
उदाहरणार्थ           
कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी       

आ) तद्भव शब्द -    

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ  
कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी     

इ) देशी किंवा देशज शब्द -     

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.    
उदाहरणार्थ       
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी. 

ई) परभाषीय शब्द –  

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.
याचे दोन उपप्रकार पडतात.      
अ. परकीय किंवा विदेशी शब्द  
ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)

अ) परकीय किंवा विदेशी शब्द

इंग्रजी शब्द –       
टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी. 
पोर्तुगीज शब्द –     
बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी. 
फारसी शब्द –      
खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.                
अरबी शब्द –
अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी           

ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द ) 

कानडी शब्द –    
तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी    
गुजराती शब्द –   
घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी     
तामिळी शब्द –
चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी    
तेलगु शब्द –
ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी 
हिंदी शब्द –     
भाई, बेटा, बच्चा, मिलाप, दाम, करोड, बात, दिल, तपास, और, नानी, मंजूर, इमली इत्यादी     

साधित शब्द 

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.          
कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यासारखे शब्द बनवितात त्यांना साधित शब्द असे म्हणतात.               
साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात. 

अ) उपसर्गघटित :- 

मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात.  
शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.  
शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटीत शब्द असे म्हणतात. 
उदाहरणार्थ  
आ + हार = आहार, याचप्रमाणे विहार, परिहार, विहार, अपहार, संहार, उपहार, प्रहार, उपाहार इत्यादी  

ब) प्रत्ययघटित शब्द :-      

प्रत्ययघटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.  
धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.
जन या धातूला प्रत्यय लागून जनन, जननी, जनता, जन्य यासारखे शब्द बनतात. या शब्दात न,क,ता,नी,य हे प्रत्यय होत. अशा त-हेचे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटीत शब्द असे म्हणतात.        
उदा.  
जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा         

क) अभ्यस्त शब्द :-      

एखाद्या शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात.     
घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबीगड, यासारख्या शब्दात एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती किंवा वित्व होऊन हे शब्द बनलेले असतात.        
अभ्यस्त म्हणजे वित्व किंवा दुप्पट करणे असा होतो.            
उदा.  
शेजरीपाजारी, किरकिर इ.  
अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार असतात.     

१) पूर्णाभ्यस्त शब्द :-          

एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येवून एक जोडशब्द बनतो तेंव्हा त्याला पुर्नाभ्यस्त शब्द असे म्हणतात.         
उदा.     
जो जो, क्षणक्षण, आतल्या आत, कळकळ, मळमळ, बडबड, बारीक बारीक, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

२) अंशाभ्यस्त शब्द :-    

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ  
अदलाबदल, उभाआडवा, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, दगडबिगड, घरबीर, शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्धामुर्धा, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिया इत्यादी      

कधी कधी पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून विरुक्ती होते.  

उदाहरणार्थ  
कागदपत्रे, कामगाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा इत्यादी            
फारसी + फारसी = अक्कलहुशारी, डावपेच, जुलूमजबरी  
फारसी + मराठी = अंमलबजावणी, कागदपत्रे, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट इत्यादी  
मराठी + फारसी = दंगामस्ती, थटामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज,

३) अनुकरणवाचक शब्द :-  

ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. काही शब्दात एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनुरुक्ती साधलेली असते.     
उदाहरणार्थ  
बडबड, किरकिर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरुतुरु, चूटचूट, गडगड, वटवट अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. 

ड) सामासिक शब्द :-

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.         
उदा.  
देवघर, पोळपाट इ. 



Comments

  1. ᐈ Casino Site ᐈ Online Casino Bonuses [2021 List
    ᐈ New Casino Sites and 샌즈카지노 Promotions — Best Online Casino Bonuses 메리트 카지노 쿠폰 List ✓ Exclusive Casino Bonuses ✓ Top 카지노 Online Casino Bonus Offers.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

वाक्प्रचार