मराठी भाषेचे अलंकार

अलंकार 

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  
अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  
उदा.
ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !              

भाषेचे अलंकार :-

भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  
केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.                
केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                
भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.          
१. शब्दालंकार  
२. अर्थालंकार         

शब्दालंकार         

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ            
गडद गडद निळे जलद भरुनी आले, 
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।                

ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          
उदाहरणार्थ              
राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी
फळा आली माय । मायेची पाठवणी

पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  
सृजनवाक्य कानी पडो, 
कलंक मातीचा झडो, 
विषय सर्वथा नावडो

दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 
आलापितो सुचवितो अरुणोदयाला

क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     
उदाहरणार्थ
मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष
हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          
ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले
औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष
श्रीकृष्ण नवरा मी नवरी  
शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  
कुस्करु नका ही सुमने  
जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            
वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           
श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.

अर्थालंकार

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ  
अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 
आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 
इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

२) उत्प्रेक्षा अलंकार :- 

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.
उदाहरणार्थ
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे
किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  
शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  
अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार

३. अपन्हुती अलंकार

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.
उदाहरणार्थ- 
आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी  
ती हाक येई कानी, मज होय शोककारी  
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे              
हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले   
मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो  
नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो           

४. रूपक अलंकार         

उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.   
उदाहरणार्थ  
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.
उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा  
दावी मुखचंद्रमा सकळीकांसी
बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी  
अमृताची वृष्टी, मज होय.                    

५. व्यतिरेक अलंकार   

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.   
उदाहरणार्थ  
अमृताहून गोड, नाम तुझे देवा             
कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान       
तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ, 
पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा         
सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,
त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो      

६. अनन्वय अलंकार    

उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध    
उदाहरणार्थ  
झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा
आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान     

७. भांतीमान अलंकार         

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.        
उदाहरणार्थ 
हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, 
म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा  
शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी  
लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी            
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे, 
पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे  
घालीन अंजन अशा मातीने तटाकी  
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी     

८. संसदेह अलंकार         

उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी विधा अवस्था होते त्या वेळी संसदेह हा अलंकार असतो.   
उदाहरणार्थ  
चंद्र काय असे, किंवा पद्य या संशयान्तरी, 
वाणी मधूर ऐकोनी कळले मुख ते असे  
चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना पतीला वाटले – 
कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा कि नभीचा ? 
चंद्र कोणता ? वदन कोणते ? 
शशांक मुख कि मुख शशांक ते? 
निवडतील निवडोत जाणते  
मानी परी मन सुखद सभमा मानू चंद्रमा, कोणता ?

९. अतिशयोक्ती अलंकार

कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्या वेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो.            
उदाहरणार्थ  
दमडीच तेल आणल, सासूबाईच न्हान झाल, 
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, 
उरल तेल झाकून ठेवल, लांडोरीचा पाय लागला, 
वेशीपर्यत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.  
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा नीज तनुवरी डाग लाहे 

१०. दृष्टांत अलंकार

एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.
उदाहणार्थ 
लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, 
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार        
न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे  
अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे

११. अर्थांतरन्यास अलंकार

एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थातरन्यास हा अलंकार होतो. (अर्थांतर -दुसरा अर्थ, न्यास = शेजारी ठेवणे)
उदाहरणार्थ 
बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरळ  
श्वानपूछ नलिकेत घातले होईना सरळ
एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी
सावळा वर बरा गौर वधूला
जातीच्या सुंदराना काहीही शोभते
मूळ स्वभाव जाईना
का मरणी अमरता ही न खरी ?
अत्युची पदे थोरही बिघडतो हा बोल आहे खरा

१२. स्वभावोक्ती अलंकार

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे ययार्थ म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात.
उदाहरणार्थ
गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, 
म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी, 
मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई, 
भिरकवुनी तो तशीच द्यायचा लकेर बेचव जशी गवई    
पोटीच एक पद लांबविला दुजा तो, 
पक्षी तनु लपवी, भूप तया पाहतो          
मातीत ते पसरले अतिरम्य पंख, 
केले वरी उदर पांडूर निष्कलंक , 
चंचू तशीच उघडी पद लांबविले  
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले                  

१३. अन्योक्ती अलंकार 

ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुस-याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. अन्योक्तीला अप्रस्तुत प्रशंसा असेही म्हणतात.               
उदाहणार्थ  
येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधून तू करीशी अनेक  
हे मूर्ख यास किमपिही नसे विवेक, रंगावरून तुझला गणतील काक                      

१४. पर्यायोक्त अलंकार            

एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रतेक्ष रीतीने सांगणे यास पर्यायोक्त असे म्हणतात.            
उदाहरणार्थ  
त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.
काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.
तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते.               

१५. विरोध किंवा विरोधाभास अलंकार        

एखाद्या विधानात वरचेवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो.     
उदाहरणार्थ
कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी, 
लोकोत्तरांची हृदये कळती न कुणासही
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा
जरी आंधळी तरी मी तुला पाहते
स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसन्यासाठी जगलास तरच जगलास
सर्वच लोक बोलू लागले कि कुणीच ऐकत नाही.              

१६. असंगती अलंकार        

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुस-या ठिकाणी असे जिथे वर्णन असते तेथे असंगती अलंकार होतो.
उदाहरणार्थ  
कुणी कोडे माझे उकलील का ? कुणी शास्त्री रहस्य कळवील का ? 
हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे  
नवरत्ने तू तुज भूषविले, मन्मन खुलले आतील का ? 
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला.  
काटा माझ्या पायी रुतला, शूर तुझ्या उरी कोमल का ? 
माझ्या शिरी ढग निळा डवरला, तुझ्या नयनी पाऊस खळखळला  
शरच्चंद्र या हृदयी उगवला, प्रभा तुझ्या उरी शीतल का ?

१७. सार अलंकार             

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेंव्हा सार हा अलंकार होतो.     
उदाहरणार्थ  
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला  
झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वदू मग किती कापिच्या अंगाचा            
काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला, 
त्यामध्ये चौथा अंक, त्यातही चार श्लोक ते        
वाट तरी सरळ कुठे पंदितील सारी, त्यातून तर आज रात्र अंधारी भारी    
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा, किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा                    

१८. व्याजस्तुती अलंकार         

बाह्यत स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जिथे वर्णन असते तिथे व्याजस्तुती हा अलंकार असतो.            
उदाहरणार्थ  
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती, 
अर्धचंद्रच तू दयावा, कृपा याहून कोणती ?           
सर्वास सर्व देशी मिथ्या हि चव स्तुती महीपाला  
न परस्त्रिया दिले त्वा वक्ष, न वा पृष्ठ तव विपक्षाला     
म्हणूनिया आलो तेंव्हा परतुनी घराला
काव्य ऐकविले ते सहधर्मचारीनीला  
गानलुब्ध तीही होई झोप ये तियेला  
काव्यरसिक तिजसम कोणी जगामधी असेल ?           

१९. व्याजोक्ती अलंकार      

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याजोक्ती हा अलंकार असतो. 
उदाहरणार्थ  
येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, 
डोळ्यांत काय गेले हे ? म्हणुनी जयना पुसे  
काग गे बघशी मागे वळूनी वळूनी अशी ? 
विचारीता म्हणे, माझी राहिली पिशवी कशी ?

२०. चेतनगुणोक्ती अलंकार

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ
आला हा दारी उभा वसंत फेरीवाला  
पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
कुटुंबवत्सल इथे फणस हा, कटीखांद्यावर घेवून बाळे  
कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आगळे
              

  

Comments

Popular posts from this blog

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

मराठी भाषेचे वृत्त

जोड शब्द व त्याचे अर्थ