उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणा-या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. (उभय म्हणजे दोन, तर अव्यय म्हणजे संबंध असा उभयान्वयी या शब्दाचा अर्थ आहे.)
उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
१) समानत्वदर्शक/प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय
२) असमानत्वदर्शक/गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय
समानत्वदर्शक/प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय
उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी म्हणजे ती सारख्या दर्जाची असतील तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानात्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्य हे समान दर्जाचे असतात म्हणजे ती वाक्य स्वतंत्र असतात ते एकमेकांवर अवलंबून नसतात. अशी वाक्य समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय म्हणून येतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे पोटप्रकार
१. समच्ययबोधक उभयान्वयी अव्यये-
समुच्यय म्हणजे बेरीज. ही उभयान्वयी दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात तसेच पहिल्या विधानात/ वाक्यात आणखी भर टाकण्याचे काम करतात. जसे- व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय, आणिक इत्यादी.
उदा.
अ) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
आ) पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
इ) भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले.
२. विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययें
विकल्प म्हणजे दोहोंतील एकाची निवड. ही उभयान्वयी अव्यये वाक्यातील दिलेल्या गोष्टीपैकी एकालाच पसंती दर्शवतात. जसे- अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.
उदा.
अ) तुला चहा हवी की कॉफी ?
आ) सिनेमाला येतोस की, घरी जातोस?
इ) तुला ज्ञान हवे की धन हवे?
ई) तू ये किंवा न ये, मी जाणारच.
३. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ( न्यनत्व म्हणजे कमीपणा )
पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात. यांना विरोधदर्शक असेही म्हणतात. जसे- किंवा, पण, परंतु, बाकी, तरी इत्यादी.
उदाहरणार्थ
अ) मरावे, परी किर्तीरूपी उरावे.
आ) लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.
४. परिमाणबोधक उभयान्वयी अव्यय
पहिल्या वाक्यातील एखाद्या गोष्टीचा परिणाम हा समोरील वाक्यात दर्शवण्यासाठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. जसे- म्हणून, सबब, याकरिता, अतएव, तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव, सबब इत्यादी.
उदा.
अ) तू गृहपाठ करीत नाहीस म्हणून तुझ्यावर शिक्षक रागवतात.
आ) ती नेहमी अभ्यास करते याकरिता ती नेहमी प्रथम येते.
इ) गाडी येताना बंद पडली, सबब मला उशीर झाला.
असमानत्वदर्शक/गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय
उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य गौण असते तेव्हा अशा अव्ययांना 'असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय'असे म्हणतात.
जेंव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य (म्हणजे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असलेले वाक्य) असेल, तर अशी असमान दर्जाची वाक्ये जोडतात तेंव्हा त्यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
१. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्यास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसर्या वाक्यात कळते.
उदाहरणार्थ
अ) एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.
आ) ती म्हणाला, की मी हरलो.
इ) मी मान्य करतो की, माझ्याकडून चुकी झाली.
२. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या अव्ययांनी जेंव्हा गौण वाक्य हे प्रधानवाक्याचा उद्देश किंवा हेतू आहेअसे दर्शविले जाते तेंव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.
उदाहरणार्थ
अ) चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो मुंबईस गेला.
आ) विजेतेपद मिळावे यास्तव त्याने खूप प्रयत्न केले.
३. कारणबोधक उभयान्वयी अव्यय
कारण का, की, कारण की , की अशा प्रकारच्या कारण दाखविणा-या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे कारण हे दुसर्या वाक्यामध्ये कळते.
उदाहरणार्थ
अ) त्याला बढती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली.
आ) आम्हाला हेच कापड आवडते, का की ते आपल्या देशात तयार झाले आहे.
४. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
जर-तर, जरी-तरी, म्हणजे, की, तर हि अव्यये संकेत किंवा अट दाखवितात अशा अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
या उभयान्वयी अव्ययामुळे एखादी कृती घडण्यामागे विशिष्ट अट सूचित असते. गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम झालेला दिसतो.
उदाहरणार्थ
अ) जर शाळेस सुट्टी मिळाली , तर मी तुमच्याकडे येईन.
आ) जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही.
इ) तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ.
ई) तू माझ्याकडे आलास कि मी येईन.
उ) प्रयत्न केला तर फायदाच होईल.
Comments
Post a Comment